महाराष्ट्रात खुर्चीसाठी ‘नुरा-कुस्ती’ चालु, PM मोदींनी संसदेत केलं पवारांच्या ‘राष्ट्रवादी’चं ‘कौतुक’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – संसदेच्या हिवाळी अधिवेशनाला आज सुरुवात झाली. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सर्व खासदारांना यावेळी संबोधित केले. राज्यसभेत सुरु झालेले आजचे सत्र हे 250 वे सत्र होते. यावेळी पंतप्रधानांनी केलेल्या भाषणामुळे राजकीय वर्तुळात चर्चाना चांगलेच उधाण आले आहे.

यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कौतुक केले. पंतप्रधान म्हणाले, संसदेत अडथळे निर्माण करण्यापेक्षा आपण संवाद कसा साधता येईल यावर भर द्यायला हवा.

एनसीपी बीजेडी बाबत बोलताना पंतप्रधान मोदी म्हणाले, सर्व राजकीय पक्षांनी नियम पाळण्याबाबत या पक्षांकडून शिकायला हवे. भाजपने सुद्धा याबाबत शिकायला हवे आणि या पक्षांचे आभार मानले पाहिजेत. जेव्हा आपण विरोधात होतो तेव्हा सुद्धा हे पक्ष काम करत होते असे पंतप्रधान यावेळी म्हणाले.

राज्यात सरकार स्थापनेवरून तिढा कायम असताना पंतप्रधानांकडून राष्ट्रवादीचे अशाप्रकारे कौतुक झाल्याने याचा काय परिणाम होणार याकडे सर्वांचे लक्ष आहे. आज सकाळी सुरु झालेल्या राज्यसभेच्या कामकाजावेळी शरद पवार देखील उपस्थित होते.

राज्यसभेत आहे कायदे निर्मितीची सुविधा –

यावेळी पंतप्रधानांनी बोलताना लोकसभा आणि राज्यसभेबाबत देखील भाष्य केले. ते म्हणाले 250 सत्रांवेळी या ठिकाणी अनेक वेळा विचारमंथन झालेले आहे. जर लोकसभा सर्वसामान्यांशी जोडलेले आहे तर राज्यसभा हे दूरदृष्टी असलेले सदन आहे. तसेच या सदनात इतिहास बनलेला आहे. अनेक दिग्गज व्यक्तिमत्व याच सदनात होते. विविधता आणि स्थिरपणा हीच या सदनाची वैशिष्ट्य असल्याचे पंतप्रधानांनी सांगितले.

बाबासाहेब आंबेडकरांची याच सदनातुन सुरुवात –

पंतप्रधान म्हणाले की, राज्यसभा कधीही भंग झालेली नाही आणि होणारही नाही. येथे राज्यांचे प्रतिनिधित्व दिसून येते. प्रत्येकाला निवडणूक पार करणे सोपे नाही, परंतु त्यांची राष्ट्रीय हितसंबंधातील उपयुक्तता कमी होत नाही. ही अशी जागा आहे जिथे अशा लोकांचे देखील स्वागत आहे. देशाने पाहिले आहे की शास्त्रज्ञ, कला, लेखक यांच्यासह अनेक मान्यवर येथे आले आहेत. याचे सर्वात मोठे उदाहरण म्हणजे बाबासाहेब आंबेडकर, काही कारणास्तव त्यांना लोकसभेत पोहोचू दिले नाही परंतु ते राज्यसभेत आले.

डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन म्हणाले होते की केवळ आपले विचार, व्यवहार आपल्या संसदीय व्यवस्थेचे औचित्य सिद्ध करतील. संविधानाचा भाग बनविलेल्या या सभागृहाची परीक्षा आपल्या कामाद्वारे होईल, आपण आपल्या विचारांनी देशाचे औचित्य साधू शकतो असा आपला प्रयत्न असावा.

मागील पाच वर्षात केले उत्तम काम –

मागील पाच वर्षाबाबत बोलताना मोदी म्हणाले, याच सदनात पहिल्यांदा अनेक कायदे पास झाले त्यात तीन तलाक, आरक्षण, जीएसटी, जम्मू काश्मीर कलम 370 रद्द, असे अनेक मोठे निर्णय याच ठिकाणी पार पडल्याचे पंतप्रधानांनी सांगितले.

Visit : Policenama.com 

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like