‘रॅली रद्द करत मोदींनी गाठली दिल्ली’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – पुलवामा दहशतवादी हल्ल्यामध्ये सीआरपीएफ ४० जवान शहीद झाले होते. त्यामुळे संपूर्ण देशभरात शोक व्यक्त होत असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी जिम कॉर्बेट नॅशनल पार्कमध्ये एक प्रमोशनल फिल्म शूट करण्यात व्यस्त होते असा आरोप काँग्रेसने केला आहे. तसेच केंद्र सरकारने आरोप फेटाळून लावत खराब वातावरण आणि नेटवर्क नसल्याने नरेंद्र मोदींना २५ मिनिटे उशिरा बातमी कळल्याचा दावा केला आहे. माहिती मिळाल्यानंतर नरेंद्र मोदी तात्काळ दिल्लीला जाण्याचा प्रयत्न केला, मात्र खराब वातावरण असल्याने पोहोचण्यास उशीर झाल्याचेही सांगण्यात आले आहे.

सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पंतप्रधान नरेंद्र मोदी सकाळी सात वाजता देहरादहूनला पोहोचले होते. पण खराब वातावरण असल्या कारणाने चार तास अडकून पडले होते. सकाळी 11.15 वाजता नरेंद्र मोदी जिम कॉर्बेट नॅशनल पार्कमध्ये पोहोचले. तिथे त्यांनी टायगर सफारी, टुरिझम झोनचे उद्घाटन केले होते. यासाठी त्यांना तीन तास लागले. यानंतर त्यांनी मोटरबोट राइड केली. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी संध्याकाळी रुद्रपूर येथे एका रॅलीला जाणार होते. पण दहशतवादी हल्ल्याची बातमी कळू लागल्यानंतर त्यांनी ती रद्द केली. त्यांनी तात्काळ राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवल, केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंग आणि जम्मू काश्मीरचे राज्यपाल सत्यपाल मलिक यांच्याकडून माहिती मागवली. आणि रामनगर गेस्ट हाऊसमध्ये पोहोचल्यानंतर मोदी सतत तिघांच्या संपर्कात होते. त्यानंतर हल्ल्याची माहिती उशिरा मिळाल्याने नरेंद्र मोदी चिडले होते. हेलिकॉप्टरने उड्डाण करण्यासाठी योग्य वातावरण नसल्याने मोदींनी रामनगर ते बरेली रस्त्याने प्रवास केला आणि तेथून रात्री दिल्लीला पोहोचले.

गुरुवारी काँग्रेस नेते रणदीप सुरजेवाला यांनी पत्रकार परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदींवर आरोप केले होते. ३ वाजून १० मिनिटांनी दहशतवादी झाला असताना नरेंद्र मोदी ६ वाजून ४० मिनिटांपर्यंत वाहिनीसोबत प्रमोशनल फिल्म शूट करण्यात व्यस्त होते असा आरोप त्यांनी केला होता. केंद्रीय मंत्री रवीशंकर प्रसाद यांनी मात्र आरोप फेटाळून लावत देशासोबत खंबीर उभे राहण्याची गरज असताना काँग्रेस आपले खरे रंग दाखवत असल्याची प्रतिक्रिया दिली होती. काँग्रेसला पुलवामा हल्ल्याची आधीच कल्पना होती का ? असा टोला त्यांनी लगावला होता.