पोलीसनामा ऑनलाईन – PM Narendra Modi Sabha | विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर (Maharashtra Assembly Election 2024) सोलापूर जिल्ह्यातील अकरा विधानसभा मतदारसंघातील महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ पंतप्रधान नरेंद्र मोदी महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. दरम्यान आज (दि.१२) सोलापूर येथे झालेल्या सभेत मोदींनी महाविकास आघाडीवर निशाणा साधला.
“मुख्यमंत्री पदावरून महाविकास आघाडीत नूरा कुस्ती आणि खेचाखेची सुरु आहे. एक पार्टी दिवसभर आपल्या नेत्याला मुख्यमंत्री पदाचा चेहरा सांगत असते. तर दुसरी पार्टी आणि काँग्रेसवाले ते दिवसभर नाकारत असतात. निवडणुकी अगोदरच महाआघाडीवाल्यांची ही परिस्थिती आहे. त्यामुळे महाविकास आघाडीवाले महाराष्ट्राला कदापि स्थिर सरकार देऊ शकत नाहीत”, असे टीकास्त्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाविकास आघाडीवर सोडले आहे.
पंतप्रधान मोदी म्हणाले, ” काँग्रेस पक्षाने देशात ६० वर्षे राज्य केले. पण, त्यांची विचारसरणी ही समस्या निर्माण करायच्या आणि लोकांना त्या समस्यांमध्ये अडकवून ठेवणे, हेच काँग्रेसचे धोरण राहिलेले आहे.महाराष्ट्राला आगामी पाच वर्षांसाठी स्थिर सरकारची गरज आहे, तर दूरगामी धोरण आखली जातील.
महाविकास आघाडीवाले ज्या गाडीतून पुढे जात आहेत, त्या गाडीला ना चाके आहेत ना ब्रेक आहे. ती गाडी कोण चालवणार, यावरून त्यांच्यात मारामारी सुरू आहे. महाविकास आघाडीची गाडी सर्वांत अस्थिर गाडी आहे. हे लोक आपापसांत भांडणातच सर्वाधिक वेळ घालवत आहेत”, अशी टीकाही नरेंद्र मोदी यांनी केली.
ते पुढे म्हणाले, ” पश्चिम महाराष्ट्रातील जनतेला काँग्रेस आणि त्यांच्या सहकारी पक्षाने पाण्यासाठी सर्वाधिक काळ त्रासवले आहे. आमच्या प्रयत्नांमुळे सोलापूर जिल्ह्यातील अनेक गावांचा जलस्तर उंचावला आहे. आमच्या सरकारने वीजबिल माफ केले आहे.
शेतकऱ्यांना बिल भरायला लागू नये, यासाठी शेतकऱ्यांना सोलर यंत्रणा देण्याची योजना आम्ही सुरू केली आहे, त्यातून शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविण्यासाठी आम्ही प्रयत्न सुरू केले आहेत”, असे मोदी यांनी म्हंटले आहे.