ठाकरे सरकार आणि केंद्रातील वादादरम्यान PM मोदींचं मोठं विधान

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – महाराष्ट्रामध्ये बाधितांची संख्या वाढत आहे. त्याचबरोबर लसीकरणही मोठ्या प्रमाणात सुरु केले आहे. मात्र, आत प्रश्न निर्माण झाला आहे तो लसीचा. केंद्राकडून पाठवलेल्या लसींचा साठा संपत आला असून एक किंवा दोन दिवस पुरेल एवढा साठा राज्यात शिल्लक आहे. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांना यासंदर्भात चर्चा केली. मात्र, त्यावेळी मुळ प्रश्न बाजूला पडला आणि केंद्र-राज्य सरकारमध्ये आरोप प्रत्यारोपांच्या फैऱ्या झडू लागल्या. दरम्यान, गुरुवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुख्यमंत्र्यांशी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून संवाद साधत कोरोना स्थितीचा आढावा घेतला. यावेळी त्यांनी कोरोना महारामारीशी लढताना आपण कोणत्याही प्रकारच्या आरोप प्रत्यारोपाला समर्थन देत नसल्याचा स्पष्ट संदेश पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिला.

मोदी म्हणाले, कोरोनबाधितांच्या वाढत्या संख्येवरुन राज्याराज्यांमध्ये स्पर्धा सुरु असल्याचे दिसते. हे राज्य खूप चांगले काम करते. तर हे राज्य निरुपयोगी असून तेथे जास्त संख्या आहे. राज्यांची तुलना करणे आजकाल फॅशन झाली आहे. रुग्णसंख्या जास्त आहे, त्यामुळे आपली कामगिरी खराब आहे असे अजिबात समजू नका. चाचण्या वाढवण्याचे लक्ष द्या. रुग्णसंख्या वाढेल. पण ही संख्या जास्त वाढल्याने आपण खराब कामिगरी करत आहोत असा विचार करण्याची अजिबात गरज नाही असेही त्यांनी उद्धव ठाकरेंना आश्वस्त करताना म्हंटले.

११ ते १४ एप्रिल दरम्यान लसमहोत्सव!
कोरोनाशी लढताना चाचण्या करणे हा एकमेव मार्ग आहे. आपल मुख्य ध्येय ७० टक्के आरटी-पीसीआर चाचणी करणे हे आहे. मात्र, काही अधिकाऱ्यांकडून चाचणीसाठी दिरंगाई होत आहे. तसा अहवाल माझ्याकडे आला असल्याचे सांगत मोदी म्हणाले, चाचणी करण्यावर भर दिला तरच योग्य निकाल हाती येणार आहे. पुढील दोन-तीन आठवडे युद्धपातळीवर काम केले तर कोरोना फैलाव रोखला जाण्याची शक्यता आहे. लसीकरण वाढवण्यासाठी ११ ते १४ एप्रिल दरम्यान, पात्र लाभार्थ्यांसाठी लस महोत्सव आयोजित करण्याचे आवाहनही त्यांनी केले. मुख्यमंत्र्यांनी केंद्राशी समन्वय साधून काम केल्यास कोरोनावर मात करणे शक्य आहे. त्यामुळे कोणीही राजकारण करू नये, ४५ वर्षावरील सर्वांचे लसीकरण करणे हे आमचे उद्दीष्ट आहे असंही त्यांनी सांगितलं.

कोरोनाचे राजकारण करणाऱ्यांना समज द्या – उद्धव ठाकरे
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गुरुवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे कोरोना लढाईत महाराष्ट्र कुठेही मागे नाही मात्र, या लढ्यात कुठलंही राजकारण आणू नये तशी समज सर्वपक्षीय नेत्यांना देण्याची विनंती केली. चाचण्यांचे प्रमाण वाढविण्यात येत आहे. मात्र, त्या प्रमाणात केंद्रानेही लसींचा पुरवठा करणे आवश्यक आहे. सध्या महाराष्ट्रात एक दोन दिवस पुरेल एवढा लसीचा साठा आहे. काही ठिकाणी तर लस संपली आहे. त्यामुळे यावर उपाययोजना करावी तसेच इतर राज्यांतून ऑक्सिजन तसेच कृत्रिम श्वसनयंत्रे (व्हेंटिलेटर्स) उपलब्ध करून द्यावीत, अशी विनंतीही मुख्यमंत्र्यानी पंतप्रधानांना केली आहे.