विजय मल्ल्याच्या कर्जापेक्षा जास्त संपत्ती आम्ही जप्त केली’ : नरेंद्र मोदी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – आम्ही विजय मल्ल्याच्या कर्जापेक्षा जास्त संपत्ती जप्त केली आहे. मल्ल्याने ९ हजार कोटींचे कर्ज घेतले होते. मात्र, आमच्या सरकारनं त्याची जगभरातील १४ हजार कोटी रुपयांची संपत्ती जप्त केली आहे. तसेच नीरव मोदी आणि विजय मल्ल्या हे देश सोडून पळून गेले, कारण सरकारने कायदे कडक केले असे विधान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत मोदी यांनी हा दावा केला आहे.

नरेंद्र मोदी म्हणाले की, ‘आम्ही विजय मल्ल्याच्या कर्जापेक्षा जास्त संपत्ती जप्त केली आहे. त्याचं कर्ज ९ हजार कोटी होतं, पण आम्ही जगभरातून त्याची १४ हजार कोटीची संपत्ती जप्त केली आहे. आधी घोटाळे करून लोक पळून जायचे आणि सरकार त्यांची नावं पण सांगत नव्हतं. आता आम्ही जी पावलं उचलत आहोत त्याने लोकांना पळून जावं लागत आहे.’

आमच्या कारवाईमुळेच विजय मल्ल्याने पळ काढला –

जेव्हा माझं सरकार आलं आणि देशाची आर्थिक परिस्थिती माझ्या समोर आली, तेव्हा माझ्यासमोर दोन पर्याय होते. पहिला पर्याय होता की, मी या लोकांनी नक्की किती पैसै कमवले, याबद्दल सगळी सत्य माहिती देशाला सांगणं आणि दुसरा पर्याय होता की, मी देशाची विस्कटलेली आर्थिक घडी पुन्हा बसवायचा प्रयत्न करणं. मी स्वार्थी राजकारणाचा मार्ग पत्कारला नाही. आम्ही केलेल्या कारवाईमुळे त्यांना पळ काढावा लागला. आम्ही असा कायदा बनवला की, जगातल्या कोणत्याही कोपऱ्यातून त्यांची संपत्ती जप्त केली जाऊ शकते, असेही मोदी म्हणाले.

मल्ल्याचे समभाग विकून हजार कोटींची वसुली –

भारतीय बँकांचे सुमारे नऊ हजार कोटी रुपयांचे कर्ज थकवून देशाबाहेर पळून गेलेल्या विजय मल्ल्याकडून १,००८ कोटी रुपयांची काल वसुली करण्यात आली आहे. युनायटेड ब्रिव्हरिज होल्डिंग्ज लि. या कंपनीतील मल्ल्याच्या नावे असलेले ७४ लाख समभाग विकून ही रक्कम जमा करण्यात आली. मल्ल्याविरोधात सुरू असलेल्या चौकशीचा भाग म्हणून सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) हे समभाग जप्त केले होते. येत्या काही दिवसांत मल्ल्याच्या आणखी काही समभागांची विक्री करण्यात येईल, अशी माहिती एका ईडीच्या अधिकाऱ्याने दिली.