‘बॅटमॅन’ MLA आकाश विजयवर्गीयवर बरसले PM मोदी ; म्हणाले, ‘मुलगा कोणाचा पण असो पक्षातून ‘हकालपट्टी’ करायला हवी’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय जनता पक्षाचे महासचिव कैलाश विजयवर्गीय यांचा मुलगा आकाश विजयवर्गीय याला एका सल्ला दिला आहे. इंदूर मधून आमदार असलेल्या आकाशने महापालिका अधिकाऱ्यांना मारहाण केल्याप्रकरणात मोदी यांनी म्हटलं आहे की, कुणाचाही मुलगा असो, हे सहन केले जाणार नाही. मंगळवारी संसदीय दलाच्या बैठकीत त्यांनी आपले हे विचार मांडले आहेत.

याविषयी अधिक बोलताना ते म्हणाले की, जामिनावर बाहेर आल्यानंतर ज्या लोकांनी त्याचे स्वागत केले, पेढे वाटले, त्या लोकांना पक्षात राहण्याचा अधिकार नाही. अशा लोकांना पक्षातून काढून टाकले पाहिजे.
महापालिका अधिकाऱ्याला केलेल्या मारहाण प्रकरणात आकाश विजयवर्गीय याला शनिवारी भोपाळ मधील विशेष न्यायालयाने जामिनावर सोडले. तसेच त्याला इंदूर मधील कारागृहातून सोडण्यात आल्यानंतर कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणात जल्लोष करत पेढे वाटत त्यांचे स्वागत केले होते.

यावेळी बाहेर आल्यानंतर त्यांनी म्हटले होते की, यापुढे मी जीवनात महात्मा गांधींच्या विचारांवर चालणार असून भविष्यात मला या प्रकारचे काम करायला लागू नये यासाठी मी प्रार्थना करतो. हे प्रकरण झाल्यानंतर कैलाश विजयवर्गीय यांनी प्रतिक्रिया देताना म्हटले होते की, ही घटना दुर्दैवी आहे. आकाश आणि महापालिका अधिकारी हे दोघेही कच्चे खेळाडू आहेत. हा फार मोठा मुद्दा नव्हता परंतु याला फार मोठे रूप देण्यात आले.

दरम्यान, २६ जून रोजी एक जुने घर पाडण्यासाठी महापालिकेचे अधिकारी गेले असता त्यांना या आमदाराने मारहाण करत माघारी पाठवले होते. या मारहाणीत या अधिकाऱ्याला मोठ्या प्रमाणात दुखापत झाली होती. सध्या त्यांच्यावर उपचार सुरु असून त्यांची प्रकृती आता स्थिर आहे.

आरोग्यविषयक वृत्त –

गंभीर आजार होण्यापूर्वी शरीर देते संकेत, वेळीच डॉक्टरकडे जा

शुगर व कोलेस्टेरॉलमुळे होऊ शकतो ‘व्हॅस्क्युलर ट्यूमर’

‘बीफ’ खाणाऱ्यांमध्ये मृत्यूचा धोका अधिक

यकृताच्या समस्येसाठी ‘कच्ची पपई’ ठरेल रामबाण उपाय