PM मोदींनी संयुक्त राष्ट्राच्या व्यासपीठावरून चीनवर साधला ‘निशाणा’, म्हणाले – ‘विकास भागीदारीच्या नावावर सहकारी देशांना असहाय्यकरत नाही भारत’

नवी दिल्ली : पीएम नरेंद्र मोदी यांनी शनिवारी संयुक्त राष्ट्र महासभेच्या वार्षिक सत्राला संबोधित केले. कोरोना महामारीमुळे पीएम मोदी यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सभेला संबोधित केले. यावेळी पीएम मोदी यांनी एकीकडे संयुक्त राष्ट्राच्या स्वरूपात बदल करण्याची मागणी जोरदारपणे उचलून धरली तर दुसरीकडे दहशतवाद आणि विस्तारवादाच्या निमित्ताने नाव न घेता पाकिस्तान आणि चीनवर निशाणाही साधला. पीएम मोदी म्हणाले, भारत जगाला आपले कुटुंब मानतो, आणि मानवतेसाठी काम करत आहे.

पीएम मोदी यांनी संयुक्त राष्ट्राची कामगिरी आणि अपयशाचा उल्लेख करत म्हटले की, म्हणण्यासाठी तर ठिक आहे की, तिसरे युद्धा झाले नाही. परंतु, या गोष्टी नाकारता येणार नाहीत की, अनेक युद्ध झाली, गृहयुद्ध झाली. दहशतवादी हल्ल्यांनी जगाचा थरकाप उडवला. रक्ताचे पाट वाहिले. या प्रकरणात जे मारले गेले ती आपल्यासारखीच माणसं होती. ती लाखो मुलं ज्यांना जगात चमकायचे होते, ती जग सोडून गेली. अनेक लोकांना आपली आयुष्यभराची कमाई गमवावी लागली. त्यावेळी आणि आज सुद्धा संयुक्त राष्ट्राचे प्रयत्न पुरेसे होते का? मागील 8-9 महिन्यांपासून संंपूर्ण जग कोरोना महामारीशी संघर्ष करत आहे. या महामारीला तोंड देण्यात संयुक्त राष्ट्र कुठे आहे? संयुक्त राष्ट्राच्या स्वरूपात बदल करण्याची आजची खरी मागणी आहे.

पीएम मोदींनी चीनवर निशाना साधताना म्हटले की, भारत जेव्हा कुणाकडे मैत्रीचा हात पुढे करतो, तेव्हा ती मैत्री कोणत्याही तिसर्‍याच्या विरूद्ध नसते. भारत जेव्हा विकासाची भागीदारी मजबूत करतो, तेव्हा त्या पाठीमागे सहकारी देशाला असाहय्य करण्याचा कट नसतो. आम्ही आमच्या विकास यात्रेतून मिळालेले अनुभव देण्यात कधी मागे राहिलो नाही.

असे मानले जात आहे की, पीएम मोदींचा इशारा चीनच्या कर्जसापळ्याच्या नितीकडे होता, ज्याअंतर्गत चीनने अनेक छोट्या देशांवर प्रथम कर्ज लादले आणि नंतर त्यांना आपल्या अटी मान्य करण्यास भाग पाडत आहे.

पीएम मोदी म्हणाले, महामारीच्या या अवघड काळात भारताने 150 देशांना आवश्यक औषधे पुरवली. जगातील सर्वात मोठा वॅक्सीन उत्पादक देश म्हणून जगाला अश्वासन देतो की, भारताची वॅक्सीन उत्पादन क्षमता या संकटातून बाहेर येणास उपयोगी पडेल. आम्ही भारत आणि आमच्या शेजारी फेज 3 क्लिनिकल ट्रायलकडे जात आहोत. वॅक्सीन डिलिव्हरीसाठी कोल्ड चेन बनवण्यात भारत सर्वांना मदत करेल. पुढील वर्षी जानेवारीत भारत सुरक्षा परिषदेचा अस्थायी सदस्य म्हणून आपली जबाबदारी पार पाडेल.

जगातील अनेक देशांनी भारतावर जो विश्वास दाखवला आहे, यासाठी मी त्यांचे आभार मानतो. जगातील सर्वात मोठी लोकशाही असण्याची प्रतिष्ठा आणि याचा अनुभव आम्ही जगासाठी वापरू. आमचा मार्ग जनकल्याणाचा आहे. भारताचा आवाज नेहमी शांतता, सुरक्षा आणि समृद्धीसाठी उठवला जाईल. भारताचा आवाज मानवता, मानवजात आणि मानवी मुल्यांचे शत्रू-दहशतवाद, अवैध शस्त्र तस्करी, ड्रग्ज, मनी लॉन्ड्रिंगच्या विरोधात उठवला जाईल, असे मोदी म्हणाले.