वाढत्या ‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर PM मोदींनी बोलावली तातडीची बैठक, मोठा निर्णय घेणार?

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – देशात कोरोना रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस मोठी वाढ होत आहे. वाढत्या रुग्णसंख्येमुळे सरकारची चिंता वाढली आहे. याच मुद्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उच्चस्तरीय बैठक बोलावली आहे. या बैठकीत कोरोना रुग्णांची वाढत्या संख्या आणि लसीकरण यासंदर्भात चर्चा होणार आहे. केंद्रीय सचिव, पंतप्रधानांचे प्रधान सचिव, आरोग्य सचिव आणि डॉक्टर विनोद पॉल हे या बैठकीला उपस्थित राहणार आहेत. देशातील कोरोना रुग्णांची वाढती स्थिती लक्षात घेता देशात आणखी कडक निर्बंध लागू करण्याच्या दृष्टीने या बैठकीत निर्णय घेतला जाऊ शकतो.

देशात कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा एकदा वाढू लगाला आहे. गेल्या 24 तासांत देशात तब्बल 93 हजार 249 नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. यासोबत देशातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या 1 कोटी 24 लाख 58 हजार 509 एवढी झाली आहे. या वर्षात एका दिवसात नोंद होणारी ही आजपर्यंतची सर्वाधिक रुग्ण वाढ आहे. तर 513 जणांचा मृत्यू झाला आहे. देशात सध्याच्या घडीला 6 लाख 91 हजार 597 अ‍ॅक्टिव्ह रुग्ण आहेत. यापैकी 4 लाख रुग्ण एकट्या महाराष्ट्रात आहेत. दुसरीकडे देशात आतापर्यंत 7 कोटी 59 लाख 79 हजार 651 जणांचं लसीकरण करण्यात आले आहे. ही बाब लक्षात घेता कोरोना स्थितीचा आढावा घेण्यासाठी उच्चस्तरीय बैठक बोलावण्यात आली आहे.

रविवारी आढळून आलेली रुग्ण संख्या आजपर्यंतची सर्वाधिक रुग्ण संख्या आहे. 18 सप्टेंबर 2020 नंतर पहिल्यांदाच देशात एकाच दिवसात इतक्या अधिक रुग्णांची नोंद झाली आहे. आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या आकडेवारीनुसार देशात शनिवारी 513 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. देशात कोरोनाची दुसरी लाट वेगाने पसरत आहे. कोरोनाच्या भयावह स्थितीचा अंदाज याच गोष्टीवरुन लावला जाऊ शकतो की, देशात एका दिवसात 90 हजाराहून अधिक रुग्ण समोर येत आहेत. देशात आढळून आलेल्या 93 हजार रुग्णसंख्येत महाराष्ट्रातील 49 हजार रुग्ण आहेत.