आज रात्री 8 वाजता PM मोदी नाही करणार ‘लॉकडाऊन’ची घोषणा, अंदाजांवर PMO नं केला खुलासा

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – पंतप्रधान कार्यालयाने कोरोना विषाणूमुळे देशातील लॉकडाऊन होण्याचे वृत्त नाकारले आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार पीएमओने म्हटले आहे की पंतप्रधान नरेंद्र मोदी आज रात्री ८ वाजता आपल्या अभिभाषणात कोणत्याही लॉकडाऊनची घोषणा करणार नाहीत.

पीएमओने म्हटले आहे की यासंदर्भातील बातमी निराधार असून यामुळे लोकांच्या मनामध्ये अनावश्यकपणे दहशत निर्माण होईल. पीएमओ म्हणाले की, या कठीण काळात अफवांची मुळीच दखल घेतली जाऊ नये.

आज रात्री ८ वाजता पंतप्रधान मोदींचे भाषण :
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज रात्री ८ वाजता कोरोना विषाणूच्या मुद्द्यावर देशाला संबोधित करणार आहेत. दरम्यान बाजारपेठेत लोक मोठ्या प्रमाणात रेशन खरेदी करत आहेत. कारण कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी देशव्यापी लॉकडाऊन जाहीर करु शकतात अशी बऱ्याच लोकांना शंका आहे. परंतु पंतप्रधान कार्यालयाने या अफवा व अनुमानांना सरसकट नामंजूर केले आहे.

कोरोना विषाणूमुळे भारतात ४ मृत्यू :
भारतात कोरोना विषाणूमुळे मृत्यू झालेल्यांची संख्या आज वाढली आहे. आज पंजाबमध्ये कोरोना विषाणूचा संसर्ग झालेल्या एका व्यक्तीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. यासह, भारतात या आजाराने मरण पावलेल्या लोकांची संख्या ४ वर पोहोचली आहे. सध्या देशात कोरोना विषाणूच्या एकूण रुग्णांची संख्या १७८ आहे. यापैकी १५ जणांवर उपचार करण्यात आले आहेत तर ४ लोकांचा मृत्यू झाला आहे. अशा प्रकारे कोरोना विषाणूचे १५९ सक्रिय रुग्ण आहेत.