देशात पुन्हा लॉकडाउन ?; PM मोदींनी बोलावली बैठक

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – देशात पुन्हा कोरोनाने डोके वर काढले आहे. अनेक राज्यांमध्ये नव्याने कोरोना रुग्ण आढळून आले आहेत, तर काही राज्यांनी रात्रीची संचारबंदी लागू केली आहे. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी महत्त्वाची बैठक बोलावली आहे. व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून होणाऱ्या बैठकीत पंतप्रधान मोदी राज्याचे मुख्यमंत्री तसेच राज्याचे इतर प्रतिनिधी आणि केंद्रशासित प्रदेशांसोबत चर्चा करण्याची शक्यता आहे. पीटीआयने दिलेल्या वृत्तानुसार, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सलग दोन बैठका होणार आहेत. बैठकीत लॉकडाउनसंबंधीही चर्चा होण्याची शक्यता आहे.

पहिल्या बैठकीत काेरोनाचे सर्वाधिक रुग्ण आढळू लागले आहेत अशा आठ राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी मोदी चर्चा करणार आहेत. त्यानंतर इतर राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशासोबत चर्चा करणार आहेत. दिल्ली तसेच महाराष्ट्रासह अनेक राज्यांमध्ये पुन्हा नव्याने कोरोना रुग्णसंख्या वाढत आहे. राज्यांमध्ये काेरोना संकट नव्याने उभे राहत असल्याने पुन्हा संचारबंदी लागू केली जात आहे. बैठकीत कोरोना लस वाटपाच्या धोरणासंबंधी पंतप्रधान मोदी चर्चा करणार आहेत.

देशात काेरोना लशीचा आपत्कालीन वापर ?
काेरोना लशीच्या तिसऱ्या टप्प्यातील चाचण्या पूर्ण होईपर्यंत व तिचा नियमित परवाना मिळेपर्यंत तिच्या आणीबाणीकालीन वापराला परवानगी देण्याची आणि त्यासाठीच्या कार्यपद्धतीची शक्यता केंद्र सरकार पडताळून पाहत आहे .निती आयोगाचे सदस्य (आरोग्य) विनोद पॉल, सरकारचे प्रधान वैज्ञानिक सल्लागार के. विजयराघवन आणि केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांच्या उपस्थितीत अलीकडेच झालेल्या बैठकीत, या लशींच्या किमतीसह आगाऊ खरेदीबाबतच्या बांधिलकीच्या मुद्द्यावरही चर्चा केली आहे.
पंतप्रधान कार्यालयाने गठित केलेली लस कृती दल (व्हॅक्सिन टास्क फोर्स- व्हीटीएफ) या लशीच्या आणीबाणीकालीन वापराच्या अधिकारांचे नियम तयार करेल, तर या लशी देण्यासाठीच्या तज्ज्ञ गटाने या लशीच्या किमतीसह ती वेळेपूर्वी बाजारात आणण्याबाबतचे नियम तयार करण्यासाठी पुढाकार घ्यावा, असे या बैठकीत ठरल्याची माहिती एका सूत्राने दिली.

आपल्या कोविड 19 लशीच्या आणीबाणीकालीन उपयोगासाठी फायझर कंपनीने अमेरिकेच्या नियामकांची परवानगी मागितल्याच्या पार्श्वभूमीवर या घडामोडींना महत्त्व आहे. अशाचप्रकारे लशींच्या आणीबाणीकालीन वापरासाठी येत्या आठवड्यात अमेरिकेच्या अन्न व औषध प्रशासनाकडे अर्ज करण्याचा आपला विचार असल्याचे ‘मॉडर्ना’ या अमेरिकेतील जैवतंत्रज्ञान कंपनीनेही म्हटले आहे.

दरम्यान, भारतात पाच लशी नैदानिक चाचण्यांच्या निरनिराळ्या टप्प्यांमध्ये आहेत. सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया ही ऑक्सफर्ड- अ‍ॅस्ट्राझेन्का कोविड 19 लशीच्या तिसऱ्या टप्प्यातील चाचण्या घेत आहे, तर भारत बायोटेक आणि भारतीय वैद्यक संशोधन परिषद (आयसीएमआर) यांनी देशात विकसित केलेल्या ‘कोव्हॅक्सिन जॅब’च्या तिसऱ्या टप्प्यातील चाचण्या यापूर्वीच सुरू केल्या आहेत. झायडस कॅडिलाने स्वदेशात विकसित केलेल्या लशीने दुसऱ्या टप्प्यातील नैदानिक चाचणी पूर्ण केली आहे. रशियाच्या ‘स्पुटनिक व्ही’ या लशीच्या दुसऱ्या व तिसऱ्या टप्प्यांतील एकत्रित चाचण्यांना डॉ. रेड्डीज लॅबोरेटरीज लवकरच सुरुवात करणार आहे.