‘या’ कारणामुळे पंतप्रधान मोदी झाले ‘ट्रोल’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – मुंबईत शुक्रवारी रात्री पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा झाली. यावेळी मोदी यांनी एका पुजनीय व्यक्तीचे नाव चुकविल्याने विरोधकांकडून त्यांना ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे. आणि ही पुजनीय व्यक्ती म्हणजे महाराष्ट्राचे आराध्यदैवत छत्रपती शिवाजी महाराज.

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे जेथे जातात, त्या भूमीतील थोर व्यक्ती, देवदेवतांची नावे घेऊन भाषणाला सुरुवात करतात. महाराष्ट्रात आले की ते कधीही छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेण्यास विसरत नाहीत. मात्र, शुक्रवारी मुंबईत झालेल्या प्रचार सभेत त्यांनी शिवाजी महाराजांचे नाव चुकविले आणि विरोधकांनी नेमकी ही बाब टिपत त्यांना ट्रोल करायला सुरुवात केली.

मोदी यांनी मुंबादेवीच्या आशिर्वादाने भाषणाला सुरुवात केल्यानंतर त्यांनी ‘छत्रपती शिवाजी महाराज’ म्हणण्याऐवजी ‘छत्रपती शिवराज महाराज’ असे उच्चारले. हे कोणाच्या लक्षात आले नाही.

ही बाब काँग्रेसचे नेते सचिन सावंत यांनी सर्वांच्या लक्षात आणून देत पंतप्रधान मोदींना छत्रपती शिवाजी महाराजांचे नावही नीट घेता येत नसल्याची टीका केली. तसेच मोदींनी स्वत:ला मावळा म्हणण्याऐवजी ‘मावला’ म्हटल्यावरही त्यांनी फटकावले. सावंत यांनी ट्विटरवर सांगितले की, छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव ही नीट न घेता येणाऱ्या मोदींनी स्वत:ला ‘मावला’ म्हटले ते योग्य झाले. मावळा कधी छत्रपती शिवराज महाराज म्हणणार नाही.