मनसेचा PM मोदींसह CM ठाकरेंवर निशाणा, म्हणाले – ‘मन की बात आहे, पण मनातलं नाही, मुख्यमंत्री आहेत, पण रस्त्यावर नाहीत’

पोलीसनामा ऑनलाइन – देशात कोरोनाने थैमान घातले आहे. दिवसेंदिवस रुग्णसंख्या वाढत असल्याने ऑक्सिजन, बेड, इंजेक्शनचा तुटवडा जाणवत आहे. तर दुसरीकडे हातावर पोट असणाऱ्यांचे कडक निर्बंधांमुळे हाल होत आहेत. याच विदारक परिस्थितीवरून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते संदीप देशपांडे यांनी ट्विट करून पंतप्रधान नरेंद्र मोदींसह मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे.

देशपांडे यांनी ट्विटमध्ये देशात आणि राज्यात नुसता गोंधळ सुरू असल्याचे अधोरेखित केले आहे. लसीकरण आहे, पण लस नाही. खाटा आहेत, पण ऑक्सिजन नाही. उपचार आहेत, पण औषध नाही. व्यापारी आहेत, पण व्यापार नाही. लोक आहेत, पण नोकरी नाही. मन की बात आहे, पण मनातले नाही. मुख्यमंत्री आहेत, पण रस्त्यावर नाहीत. सगळेच रामभरोसे आहे, पण त्यात काहीच राम नाही, असे म्हणत टीकास्त्र सोडलं आहे.

राज्यासह देशातील स्थिती बिकट होत आहे. महाराष्ट्रात दररोज 50 ते 60 हजार कोरोनाबाधित रुग्ण आढळून येत आहेत. बेड, ऑक्सिजन आणि रेमडेसिवीरच्या तुटवड्यामुळे महाराष्ट्रात मोठे संकट निर्माण झाले आहे. हळूहळू परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न होत असून, राज्य सरकारकडून विविध उपाययोजना सुरु आहेत. मात्र, राज्यात वाढलेल्या मृतांच्या संख्येमुळे चिंता कायम आहे. दुसरीकडे देशातील परिस्थितीही हाताबाहेर जात असल्याचे चित्र आहे. दिल्लीत दररोज ऑक्सिजन अभावी रुग्णांना जीव गमवावा लागत आहे., देशात दररोज साडेतीन हजारांच्या आसपास रुग्णांचा मृत्यू होत आहे.