PM मोदी 16 फेब्रुवारीला जाणार वाराणसीत, 3 ज्योतिर्लिंगांना जोडणार्‍या ‘महाकाल’ एक्सप्रेसला दाखवणार ‘हिरवा’ झेंडा

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – प्रधानमंत्री नरेंद्र मोदी १६ फेब्रुवारीला आपल्या संसदीय मतदारसंघात म्हणजेच वाराणसीचा दौरा करणार आहेत. यावेळी पंतप्रधान मोदी ३० पेक्षा जास्त प्रकल्पांचे उद्घाटन करणार आहेत. त्याचबरोबर पंतप्रधान मोदी आपल्या दौऱ्यात बनारस हिंदू विद्यापीठातील (बीएचयू) ४३० बेड्स च्या सुपर स्पेशालिटी सरकारी हॉस्पिटलला भेटही देतील.

पंतप्रधान नरेंद्र मोदी व्हिडिओ लिंकद्वारे आयआरसीटीसीच्या महाकाल एक्सप्रेसला हिरवा झेंडा दाखविणार आहेत. रात्रभर चालणारी ही रेल्वे वाराणसी, उज्जैन आणि ओंकारेश्वर या तीन तीर्थक्षेत्रांना जोडणार आहे. या बरोबरच पंतप्रधान मोदी पं. दीनदयाळ उपाध्याय मेमोरियल सेंटर मध्ये पं. दीनदयाल उपाध्याय यांच्या ६३ फूट उंच पुतळ्याचे अनावरणही करणार आहेत.

तीन कॉर्पोरेट ट्रेन सुरू
यासह भारतीय रेल्वेचे पीएसयू आयआरसीटीसी सर्वसामान्यांसाठी तिसरी कॉर्पोरेट रेल्वे सुरू करण्यास तयार आहे. ही रेल्वे वाराणसी आणि इंदूर दरम्यान धावणार आहे आणि यास काशी महाकाल एक्सप्रेस नाव देण्यात आले आहे. या रेल्वेचे उद्घाटन २० फेब्रुवारी २०२० रोजी वाराणसी येथून केले जाईल आणि त्यानंतर नियमित फेऱ्या सुरू करण्यात येतील. ही रेल्वे आयआरसीटीसी संचलित लखनऊ-नवी दिल्ली-तेजस आणि अहमदाबाद-मुंबई तेजस व्यतिरिक्त असणार आहे. आता या तिन्ही रेल्वे कॉर्पोरेट प्रकारात येतील.

तीन ज्योतिर्लिंगाचे होणार दर्शन
ही एक रात्रभर चालणारी सुपरफास्ट वातानुकूलित रेल्वे असणार आहे, जिच्यात बर्थ देखील असेल. ही रेल्वे तिन्ही ज्योतिर्लिंग – ओंकारेश्वर (इंदूरच्या जवळ) महाकालेश्वर (उज्जैन) आणि काशी विश्वनाथ (वाराणसी) च्या व्यतिरिक्त मध्य प्रदेशची राजधानी भोपाळ आणि औद्योगिक व शैक्षणिक केंद्र इंदूरला जोडेल. ही रेल्वे आठवड्यातून तीन वेळा वाराणसी आणि इंदूर दरम्यान उज्जैन, संत हिरानगर (भोपाळ), बीना, झाशी, कानपूर, लखनऊ / प्रयागराज आणि सुलतानपूर दरम्यान धावेल.

काशी महाकाल एक्सप्रेस आयआरसीटीसी द्वारे चालवण्यात येणारी तिसरी कॉर्पोरेट पॅसेंजर रेल्वे आहे, जी देशातील कार्पोरेट रेल्वेच्या संचालनासाठी रेल्वे मंत्रालयाचा एक पुढाकार आहे.