PM मोदी CM उद्धव ठाकरेंसोबत साधणार संवाद ‘या’ मुद्द्यांवर चर्चा होण्याची शक्यता

पोलिसनामा ऑनलाईन – देशात कोरोनाबाधितांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. जून महिन्याच्या मध्यापर्यंतच देशातील कोरोनाग्रस्तांच्या संख्येने 3 लाखांचा टप्पा पार केला आहे. तर दुसरीकडे महाराष्ट्र आणि दिल्लीतही कोरोनाबाधितांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. त्यापार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी संवाद साधणार आहे. 16 आणि 17 जून रोजी दुपारी 3 वाजता व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे ते सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी संवाद साधतील. निरनिराळ्या राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी ते दोन टप्प्यांमध्ये संवाद साधणार आहेत. दरम्यान, या बैठकीअंतर्गत 17 जून रोजी ते मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी संवाद साधणार आहे.

देशात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता 24 मार्च रोजी देशात 21 दिवसांचा लॉकडाउन लागू करण्यात आला होता. त्यानंतर लॉकडाउनमध्ये तीन वेळा वाढ करण्यात आली होती. 8 जूनपासून अनलॉक 1 अंतर्गत काही प्रमाणात सुट देण्यास सुरुवात करण्यात आली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे या बैठकीत सर्व प्रथम सर्व राज्यातील परिस्थितीचा आढावा घेण्याची शक्यता आहे. अनलॉक 1 अंतर्गत काही प्रमाणात सुट देण्यात आली, त्यानंतर निर्माण झालेल्या परिस्थितीची समिक्षाही करण्यात येऊ शकते. याव्यतिरिक्त राज्यांमधील परिस्थितीत सुधारण्याकरिता काही सूचनाही करण्यात येऊ शकतात.