शिवसेनेसह विरोधकांना डावलत भाजपचे ‘मिशन निवडणुक’ सुरु

पंतप्रधानांच्या कार्यक्रमाचा प्रोटोकॉल पायदळी तुडविला

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – शिवसेनेबरोबरच इतर पक्षांना घेऊन महायुती विधानसभा निवडणुक लढविणार असल्याची घोषणा विरत नाही त्याअगोदरच भाजपाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मुंबई दौऱ्यात शिवसेनेला दूर ठेवण्याचा प्रयत्न करुन आपली मिशन निवडणुक मोहीम सुरु केली आहे. औरंगाबादेतही स्थानिक खासदार इम्तियाज जलील यांचे नाव निमंत्रण पत्रिकेत न टाकता शासकीय प्रोटोकॉल धुडकावून लावला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज मुंबई व औरंगाबाद दौऱ्यावर येत आहे. मुंबई मेट्रोतील भूमिगत कामाचे ते भूमिपुजन करणार आहेत. या कार्यक्रमाची निमंत्रण पत्रिका छापताना त्यातून शिवसेनेचे महापौर आणि स्थानिक शिवसेना खासदार यांची नावे जाणीवपूर्वक वगळण्यात आली आहेत. शासकीय कार्यक्रमात महापालिका क्षेत्रात महापौर व जेथे कार्यक्रम होत आहे.

त्या ठिकाणच्या खासदाराचे नाव निमंत्रण पत्रिकेत छापणे बंधनकारक आहे. तसा प्रोटोकॉल आहे. असे असताना इतर वेळी त्याचे पालन होते पण निवडणुका आल्यावर मात्र विरोधी खासदार, महापौर यांची नावे जाणीवपूर्वक वगळली जातात असा शिवसेनेला यापूर्वीही अनुभव आला होता. यंदा युती असूनही पुन्हा तोच अनुभव आला. एमएमआरडीएच्या आयुक्तांनी याबाबत दिलगिरी व्यक्त केल्यानंतर आता महापौर व खासदार राहुल शेवाळे कार्यक्रमाला जाणार आहेत.

दुसरीकडे औरंगाबाद येथील आरिक (औरंगाबाद इंडस्ट्रियल सिटी) या प्रकल्पाचा लोकार्पण सोहळा व आरिक हॉलचे उद्घाटन पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते होणार आहे. या कार्यक्रमाच्या निमंत्रण पत्रिकेत अगदी रेल्वे मंत्र्यापासून महिला व बाल विकासच्या मंत्री, राज्यमंत्री, ग्रामविकासचे  राज्यमंत्री अशा सर्वांची नावे आहेत. मात्र, स्थानिक खासदार भाजपाचे नसल्याने एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांचे नाव यातून वगळण्यात आले आहे.

निमंत्रण पत्रिकेत नाव वगळल्याचे इम्तियाज जलील यांनी दाखवून देऊन या घटनेची माहिती पंतप्रधान कार्यालयाला कळविले असून कार्यक्रमस्थळी याचा निषेध करणार असल्याचे सांगितल. तरीही आज या कार्यक्रमाची पानभर जाहीरात सर्व दैनिकात प्रसिद्ध झाली आहे. त्यातही ही चूक दुरुस्त करण्यात आलेली नाही. याचा अर्थ निवडणुकीत मित्रांबरोबर विरोधकांना श्रेय मिळता कामा नये, या उद्देशाने भाजपाने चक्क पंतप्रधानांच्या कार्यक्रमाचा प्रोटोकॉल पायदळी तुडविला आहे.