…म्हणून PM मोदींनी परिचारिकांना ऐकवला ‘विनोद’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – लस टोचण्यापूर्वी नर्सिंग ऑफिसर्सचे टेन्शन दूर करण्याची पंतप्रधान नरेंद्र मोदींची इच्छा होती. यासाठी पंतप्रधान मोदीनी त्यांना विनोदही ऐकवला. त्यांच्याशी त्यांच्याच भाषांतून संवादही साधला आणि कोण कुठून आहे, असे विचारले. यामुळे बरीच मदत झाली, कारण कुणाला लस टोचायची हे परिचारिकांना माहीत नव्हते, असे एम्सचे संचालक रणदीप गुलेरिया यांनी सांगितले.

पंतप्रधान नरेंद्र मोदीनी सोमवारी (दि. 1) दिल्लीतील एम्स रुग्णालयात कोरोना लशीचा पहिला डोस घेतला. यावेळी त्यांच्यासोबत एम्सचे संचालक रणदीप गुलेरिया देखील उपस्थित होते. ज्येष्ठ नागरिक आणि इतर आजारांनी ग्रस्त 45 वर्षांहून अधिक वय असलेल्या नागरिकांच्या लसीकरणाला सुरुवात होताच, पहिल्याच दिवशी पंतप्रधान मोदींनी डोस घेतल्याने लोकांच्या मनातील लशीसंदर्भातील भीती दूर व्हायला हवी, असे गुलेरिया म्हणाले.

मोदींनी सोमवारी सकाळी भारत बायोटेकने तयार केलेल्या स्वदेशी लशीचा डोस घेतला. तसेच पंतप्रधानांच्या लसीकरणासंर्दभात एम्सला रविवारी रात्री उशिरा माहिती मिळाली होती. त्यांच्यासाठी कसल्याही प्रकारची विशेष व्यवस्था केली नव्हती. कारण सोमवारी कामकाजाचा दिवस असल्याने, या दिवशी रुग्णालयात येणाऱ्या इतर रुग्णांना कसल्याही प्रकारचा त्रास होऊ नये म्हणून, पंतप्रधानांनी सकाळी लवकर लस टोचून घेण्याचा निर्णय घेतला होता.