3 ऑक्टोबरला होणार अटल बोगद्याचे उद्घाटन, PM मोदींसह कंगना रणौत देखील होणार सहभागी

नवी दिल्लीः वृत्तसंस्था – पंतप्रधान नरेंद्र मोदी 3 ऑक्टोबर रोजी रोहतांगमध्ये बांधल्या गेलेल्या जगातील सर्वात लांब ‘अटल बोगद्या’चे उद्घाटन करण्यासाठी मनालीला पोहोचत आहेत. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, या उद्घाटन सोहळ्यानिमित्त कंगना रणौत देखील सहभागी होऊ शकते. 17 सप्टेंबर रोजी कंगनाने पंतप्रधानांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या होत्या, त्याचबरोबर मोदींनी देखील कंगनाचे नाव घेऊन सोशल मीडियाच्या माध्यमातून तिचे आभार मानले. शिवसेनेकडून कंगनाला धमकी दिल्यामुळे पंतप्रधानांच्या संमतीने कंगनाला वाय प्लस सुरक्षा मिळाली आहे.

अशा परिस्थितीत असे मानले जात आहे की, कंगना पंतप्रधान मोदींना भेटू शकते. येथे हे देखील उल्लेखनीय आहे की, कंगना रणौत हीने बॉलिवूडमधील सुधारणेसह काश्मिरी पंडितांच्या मुद्द्यांवर चर्चा करण्यासाठी गेल्या अनेक दिवसांपासून पंतप्रधानांना भेटण्याची इच्छा व्यक्त केली होती. या व्यतिरिक्त कंगनाने पंतप्रधानांना अनेक वेळा पाठिंबा दर्शविला असून नुकत्याच पार पडलेल्या शेतकरी बिलांवर कंगनाने पंतप्रधानांची जोरदार प्रशंसा केली आहे.

रोहतांगमध्ये बांधलेला अटल बोगदा कोणत्याही आश्चर्यापेक्षा कमी नाही. समुद्रकिनार्‍यापासून 10 हजार 40 फूट उंचीवर बनवलेल्या या बोगद्यात आज व भविष्यात आवश्यक असणारी सर्व वैशिष्ट्ये आहेत. बोगद्याच्या प्रत्येक अर्ध्या किलोमीटरवर, आपत्कालीन बोगदा बनविला गेला आहे, तर सुरक्षेसाठी दोन्ही बाजूंनी कंट्रोल रूमही बनविण्यात आले आहे.

याशिवाय बोगद्यामध्ये दर 150 मीटरवर 4 जी फोन आणि दर 60 मीटरवर सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी आता 3 ऑक्टोबर रोजी या अद्भुत बोगद्याचे उद्घाटन करतील आणि ते जनतेला समर्पित करतील.