7 मार्च रोजी साजरा होणार जन औषधी दिन, पंतप्रधान लाभार्थ्यांशी करणार चर्चा

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – गेल्या वर्षी सुरु झालेल्या कोरोना महामारीनंतर केंद्र सरकारने आरोग्य सुविधांवर लक्ष केंद्रित करण्यास सुरुवात केली आहे. एवढेच नव्हे या आर्थिक वर्षाच्या बजेटमध्येही आरोग्य सेवांना जास्त महत्व मिळाले. त्यात लॉकडाऊनमुळे मंदावलेल्या अर्थव्यवस्थेमुळे महागाई देखील डोके वर काढत आहे. अश्या परिस्थिती सर्वसामान्यांना कमी दरात औषधे उपलब्ध करून देण्यासाठी केंद्रातील मोदी सरकार सतत प्रयत्न करत आहे. सरकारने लोकांना देशाच्या विविध भागात जन औषधि केंद्रे उघडण्यासाठी देखील प्रोत्साहित केले. ही सार्वजनिक सेवा सुरू होऊन आता तीन वर्षे झाली आहेत. येत्या 7 मार्च रोजी जन औषधी दिन साजरा केला जाणार आहे. यानिमित्ताने सकाळी 10 वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वतः त्या लाभार्थ्यांशी चर्चा करतील. पंतप्रधान थेट व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संपर्क साधतील. हे लाभार्थी देशातील विविध ठिकाणी उपस्थित राहतील. यावेळेस जन औषधी दिवस थीम ‘सेवा भी – रोजगार भी’ आहे.

केंद्र सरकार चालवितेय ही विशेष योजना
जन औषदी केंद्रांची व्याप्ती वाढवण्यासाठी आणि देशातील अधिकाधिक लोकांपर्यंत हे पोहोचण्यासाठी केंद्र सरकार एक विशेष योजना चालवित आहे. या केंद्रांमध्ये स्वस्त दरात दर्जेदार औषधे उपलब्ध केली जात आहे. ताज्या आकडेवारीनुसार, सध्या देशभरात 734 जिल्ह्यांत सुमारे 7,400 पेक्षा जास्त जन औषधी स्टोअर्स आहेत.

स्वयंरोजगाराला मिळणार सामर्थ्य
माहितीनुसार, 2019-20 दरम्यान जन औषधी योजनेच्या माध्यमातून 433.61 कोटी रुपयांची विक्री झाली. अंदाजानुसार या उपक्रमातून देशातील सामान्य नागरिकांच्या सुमारे 2500 कोटी रुपयांची बचत झाली. केंद्र सरकारचा दावा आहे की, ही औषधे सरासरी बाजारभावापेक्षा 50 ते 90 टक्के स्वस्त आहेत. तर चालू आर्थिक वर्षात 2020-21 मध्ये 28 फेब्रुवारीपर्यंत एकूण 586.50 कोटी रुपयांची विक्री झाली आहे. या उपक्रमामुळे कायमस्वरुपी आणि नियमित उत्पन्नासह स्वयंरोजगाराला चालना मिळेल, असा सरकारचा विश्वास आहे.