TMC चा बालेकिल्ला असलेल्या ब्रिगेड परेड मैदानावर PM नरेंद्र मोदी यांची आज सभा; व्यासपीठावर मिथुन चक्रवर्ती, सौरभ गांगुली ?

नवी दिल्ली : वृत्त संस्था –  विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आज रविवारी येथील ब्रिगेड परेड मैदानावर जाहीर सभा होत असून या सभेत क्रिकेटपटू सौरव गांगुली, अभिनेते मिथुन चक्रवर्ती यांच्या सह काही नामवंत मंडळी भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा सुरु आहे.
सौरभ गांगुली याने आपल्या पक्षात यावे, यासाठी तृणमूल काँग्रेस व भाजपकडून प्रयत्न सुरु होते. गांगुली यांना दोनदा रुग्णालयात दाखल करावे लागले, तेव्हा दोन्ही पक्षांच्या नेत्यांनी त्यांची भेट घेतली होती.

विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने भाजपने परिवर्तन यात्राचे आयोजन केले होते. त्याचा समारोप व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची पहिली सभा आज रविवारी ब्रिगेड परेड मैदानावर होत आहे. हा संपूर्ण परिसर  तृणमूल काँग्रेसचा बालेकिल्ला समजला जातो. त्यामुळे पंतप्रधान मोदी यांची पहिली सभा भव्य करण्याचा भाजपाचा प्रयत्न आहे.

तृणमूल काँग्रेसचे  नेते आणि माजी रेल्वेमंत्री दिनेश त्रिवेदी यांनी अखेर शनिवारी भाजपमध्ये प्रवेश केला. डॉ. मनमोहन सिंग यांच्या मंत्रिमंडळात त्रिवेदी रेल्वेमंत्री होते. तेव्हा रेल्वे भाड्यात वाढ केल्याने ममता बॅनर्जी यांनी टिका केली होती. त्यामुळे त्यांनी रेल्वेमंत्रीपदाचा राजीनामा दिला होता. त्यांनी १२ फेब्रुवारी रोजी राज्यसभा खासदारकीचा राजीनामा दिला होता. त्याचवेळी ते भाजपमध्ये प्रवेश करणार हे निश्चित झाले होते.

तृणमूल काँग्रेसकडून चार वेळा आमदार राहिलेल्या सोनाली गुहा यांना पक्षाने तिकीट नाकारले आहे. त्यांच्याबरोबरच दिनेश बजाज यांनीही भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचे स्पष्ट केले आहे.