PMC Bank घोटाळा : प्रवीण राऊतांना ED चा मोठा धक्का

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – शिवसेनेचे नेते आणि खासदार संजय राऊत (Shivsena Sanjay Raut) यांच्या पत्नी वर्षा राऊत (Varsha raut) यांना सक्तवसुली संचालनालय म्हणजेच ईडीने (ED) नोटीस बजावल्यामुळे राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. आता या प्रकरणात प्रवीण राऊत यांच्याबद्दल ईडीने 72 कोटींच्या मालमत्तेचा दावा केला आहे. असे वृत्त एका वृत्तसंस्थेने दिले आहे.

वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार, ईडीने मनी पीएमसी बँक घोटाळ्यात प्रवीण राऊत यांच्यावर संशय व्यक्त केला आहे. या प्रकरणामध्ये प्रवीण राऊत यांच्याकडे 72 कोटी रुपयांची संपत्ती असल्याचा दावा ईडीने केला आहे. हा व्यवहार मनी लाँड्रिंग कायद्याचे उल्लंघन असल्याचे म्हणत ही संपत्ती ईडीने जोडली आहे. त्यामुळे प्रवीण राऊत यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. दरम्यान, संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांनी ईडीने समन्स बजावला होता. त्यांना 29 डिसेंबर रोजी ईडी कार्यालयामध्ये हजर राहण्यास सांगितले होते, मात्र, संजय राऊत यांनी यासाठी मुदत मागितली होती.

काय आहे प्रकरण ?
PMC बँक घोटाळा प्रकरणात HDIL च्या वाधवा बंधुंवर कारवाई करण्यात आली होती. गोरेगाव येथील एका पुर्नविकास प्रकल्पात HDIL ची आर्थिक अनियतता दिसून आली होती. त्यामुळे ही कारवाई करण्यात आली होती. सुरुवातीला या प्रकरणाचा तपास EOW करत होती. त्यानंतर हा तपास ED कडे गेला.

वाधवा बंधू यांच्याकडे केलेल्या चौकशीमध्ये प्रवीण राऊत यांचे नाव पुढे आले होते. प्रवीण राऊत हे शिवसेना खासदार संजय राऊत यांचे निकटवर्तीय असल्याची माहिती आहे. प्रवीण राऊत यांच्या पत्नीच्या खात्यामधून वर्षा राऊत यांना 55 लाख रुपये देण्यात आल्याचे समोर आले आहे. त्यामुळे हे पैसे का घेतले गेले, याची माहिती ईडीला पाहिजे. विशेष म्हणजे राज्यसभा सदस्यपदाच्या शपथ पत्रात संजय राऊत यांनी या पैशांचा उल्लेख केला असून. पत्नी वर्षा राऊत यांच्याकडून घेण्यात आलेले 55 लाख कर्जाच्या स्वरुपात घेतल्याचे त्यांनी शपथपत्रात नमूद केले.