PMC Bank Scam : संचालक बधावनकडे 3 हजार 500 कोटींची 2100 एकर जमिन

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – पंजाब-महाराष्ट्र सहकारी बँक घोटाळ्यातील प्रमुख आरोपी आणि एचडीआयएलचे संचालक राकेश बधावन आणि मुलगा सारंग यांच्याकडे 2100 एकर जमीन असल्याचे तपासात समोर आले आहे. या जमिनीची किंमत तब्बल 3 हजार 500 कोटी रुपये असल्याचे सांगण्यात येत आहे. अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) जमीन जप्त करण्यासाठी पावले उचलली असून ही जमीन वसई-पालघर येथील सात वेगवेगळ्या गावामध्ये आहे.

टाउनशिपसाठी खरेदी केली जमीन
राकेश आणि सारंग यांनी टाऊनशिप उभारण्यासाठी खूप वर्षापूर्वी ही जमीन खरेदी केली होती. मात्र, टाऊनशिप उभारण्याचे काम सुरु झाले नाही. या रिकाम्या भूखंडावर कोणीही अतिक्रमण केले नसल्याचे वृत्त एका इंग्रजी वृत्तपत्राने दिले आहे. ही जमीन बधावन किंवा एचडीआयएलच्या नावाने खरेदी केली आहे का याचा तपास ईडीकडून करण्यात येत आहे. ईडीकडून या जमीनीची कागदपत्रे तपासली जात आहेत.
एचडीआयएल दिवाळखोरीत

एचडीआयएल सध्या दिवाळखोरीत निघाले आहे. या ग्रुपच्या कंपन्यांनी पीएमसी बँकेकडून नियमबाह्य 1 हजार 606 कोटी रुपयांचे कर्ज घेतले आहे. पिएमसी घोटाळ्यातील प्रमुख आरोपी राकेश बधावन याच्याकडे 1 हजार 903 कोटी तर सारंग याच्याकडे 129 कोटी रुपयांची थकबाकी आहे. पिएमसी बँकेकडून कर्ज घेताना राकेश आणि सारंग यांनी त्यांच्याकडे असलेल्या 2100 एकर जमीनीपैकी 600 एकर जमीन पिएमसी बँकेकडे तारण ठेवली आहे.

या व्यतिरीक्त 400 एकर जमीन इतर बँकांकडे तारण ठेवलेली आहे. 2100 एकर जमीनीपैकी 1000 हजार एकर जमीन तारण ठेवण्यात आली असून 1100 एकर जमीन तारण ठेवण्यात आलेली नसल्याचे समोर आले आहे. उर्वरीत 1100 एकर जमीन मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने यापूर्वी जप्त केलेल्या जमिनीपैकी ही जमीन वेगळी जमीन आहे.

अन्य चार बँकेतही घोटाळा
एचडीआयएलच्या मालकांवर इतर चार बँकांमध्ये घोटाळा केल्याचा आरोप आहे. यामध्ये तीन सरकारी बँका आहेत तर एक खासगी बँकेचा समावेश आहे. या प्रकरणी सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) शुक्रवारी (दि.4) मुंबई व परिसरातील सहा ठिकाणी छापे टाकले. या कारवाईदरम्यान ईडीने एचडीआयएलचे चेअरमन राकेश बधावन आणि त्यांचे पुत्र सारंग बधावन यांचे खासगी जेट आणि ६० कोटी रुपये किंमतीचे दागिने जप्त केले.

या व्यतिरीक्त अलीबाग येथील 22 खोल्यांचा बंगला, ऑडी, तीन सेडान कार, तीन महागड्या दुचाकी, स्पीडबोट जप्त करण्याची प्रक्रिया ईडीने सुरु केली आहे. अलिबाग येथे असलेला बंगला 2.2 एकरमध्ये असून याठिकाणी सारंग फिल्म इंडस्ट्रीमध्ये असलेल्या मित्रांना पार्टी देत होता.

Visit : Policenama.com

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like