PMC घोटाळा प्रकरण : संचालकासह तिघांना अटक

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – मुंबई पोलिस आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने गुरुवारी पंजाब अँड महाराष्ट्र सहकारी बँकेच्या (पीएमसी) ४ हजार ३३५ कोटींच्या गैरव्यवहार प्रकरणी तिघांना अटक केली आहे. या तिघांना अटक केल्यामुळे आरोपींची संख्या आता १५ वर पोहचली आहे. अटक केलेल्यांची नावे तत्कालीन संचालक जसविंदर सिंह बानवैत, बँकेतील वस्तूंचे मूल्यांकन करणाऱ्या कंपनीचे पदाधिकारी विश्वनाथ श्रीधर प्रभू आणि श्रीपाद गोविंद जेरे अशी आहेत.

याअगोदर अटक केलेल्या आरोपींच्या चौकशीतून पीएमसीच्या संचालकांपैकी एक आणि कर्ज व आगाऊ रक्कम समितीचे सदस्य असलेल्या जसविंदर सिंह बानवैत यांचे नाव समोर आले. त्याच्यासह मालमतेचे आणि वस्तू यांचे मूल्यांकन करण्याची जबाबदारी असलेल्या यार्डी प्रभू कन्सल्टंट ॲन्ड व्हॅल्यूअर्स प्रायव्हेट लिमिटेडचे पदाधिकारी विश्वनाथ प्रभू आणि श्रीपाद जेरे यांचीही नावे पुढे आली. यानंतर पोलिसानी या तिघांना चौकशीसाठी ताब्यात घेतले. त्यांच्याकडून एचडीआयएल समूहाला करण्यात आलेले कर्ज वितरण, थकबाकी याबाबत चौकशी करण्यात आली. मात्र, त्यांना उत्तरे मिळाली नाहीत. त्यामुळे या तिघांना पोलिसानांनी गुरुवारी सकाळी न्यायालयासमोर हजार केले. या तिघांना १६ मार्चपर्यंत न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली आहे.

भाजपचे माजी आमदार सरदार तारासिंग यांचा मुलगा राजनित सिंग यांच्यासह याप्रकरणात एचडीआयएल कंपनीने कार्यकारी अध्यक्ष राकेश वाधवान आणि व्यवस्थापकीय संचालक सारंग वाधवान यांच्यासह पीएमसीचे निलंबित व्यवस्थापकीय संचालक जॉय थॉमस, अध्यक्ष वारियामसिंग कर्तारसिंग आणि एस. सुरजितसिंग अरोरा यांना अटक केली आहे.