पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – PMC Solid Waste Management Dept | कचरा प्रक्रिया प्रकल्पांची ‘कोट्यवधीं’ची टेंडर्स काढण्यात मश्गुल असलेल्या घनकचरा विभागाचे दारोदारी फिरून कचरा गोळा करणाऱ्या कर्मचाऱ्यांकडे मात्र दुर्लक्ष आहे. या कर्मचाऱ्यांना चप्पल, हॅन्डग्लवज, रेनकोट, ढकलगाड्यांसह अन्य आवश्यक वस्तूंचा पुरवठा करण्याची जबाबदारी असलेल्या घनकचरा विभागाने या वस्तू पुरवल्याच नाहीत. त्यामुळे कचरा वेचकांना भरपावसात भिजतच काम करावे लागत असल्याचे ‘अमानवीय’ दृश्य शहरातील गलोगल्लीत पाहायला मिळत आहे.
महापालिका (Pune Municipal Corporation-PMC) शहरातील सुमारे 70 टक्क्यांहून अधिक घरातून घरोघरी जाऊन कचरा गोळा करते. आजमितीला ‘स्वच्छ’ या सहकारी संस्थेसह अन्य संस्थांचे 7 हजारहून अधिक कर्मचारी वर्षभर हे काम करतात. यामध्ये प्रामुख्याने स्वच्छ संस्थेचा वाटा मोठा असून यामध्ये जवळपास चार हजार कर्मचारी आहेत. गरीब आणि आश्रित घटकातून येणारे हे सदस्य ‘कष्टाची भाकर’ या भावनेतून हे काम स्वीकारतात. अगदी वृद्धत्वाकडे झुकलेले महिला – पुरुष या कामामुळे स्वाभिमानाने जगत आहेत. या कर्मचाऱ्यांना घरटी कचरा गोळा करण्याचे दरमहा 80 रुपये मिळतात. त्यांना दरवर्षी हॅन्डग्लोवज, रेनकोट, साबण, अँप्रन आणि ढकलगाड्या पुरवण्याची जबाबदारी ही महापालिकेची आहे.
परंतु यावर्षी महापालिकेकडून त्यांना या वस्तूंचा पुरवठा करण्यात आलेला नाही. यासाठी स्वच्छ संस्थेकडून अगदी जानेवारीपासून घनकचरा विभागाकडे पाठपुरावा करण्यात येत आहे. मात्र अद्यापही त्यांना या वस्तू मिळालेल्या नाहीत. अनेक कर्मचाऱ्यांकडे रेनकोट नाहीत. त्यामुळे त्यांना भरपावसातच हे काम करावे लागत आहे. जुन्या ढकलगाड्या नादुरुस्त झाल्या आहेत. त्यांची तात्पुरती डागडुजी करण्यात येत आहे. नव्याने गाड्या तयार करण्याचे काम सुरू आहे. मात्र त्या गाड्यांच्या आकारत ‘ बचत’ करण्यात आल्याने त्या लुडकत आहेत. येथेही भ्रष्टाचार झाल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. कचरा गोळा करायच्या बकेट नाहीत.
दुसरीकडे मात्र घनकचरा विभाग कचरा प्रक्रिया प्रकल्प, यांत्रिक झाडणकामाच्या कोट्यवधी रुपयांच्या निविदांमध्ये अधिक इंटरेस्टेड असल्याचे दिसून येत आहे. निविदा कोणाला मिळाव्यात यासाठी अगदी राजकीय पाठिंबा मिळवण्यासाठी रक्ताचे पाणी करत असल्याचे दृश्य महापालिकेत पाहायला मिळत आहे. घनकचरा विभागाच्या मागील काही महिन्यातील कार्यपद्धतीची वरिष्ठ स्तरावर दखल घेतली गेली असून लवकरच या विभागात खांदेपालट होण्याची जोरदार चर्चा महापालिका वर्तुळात सुरू आहे.
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
हे देखील वाचा
Pune Pimpri Chinchwad Crime News | पिंपरी : भांडण सोडवणाऱ्या अल्पवयीन मुलाला मारहाण; एकाला अटक