‘कोरोना’ व्हायरस बाबत PMO मध्ये बैठक, PM मोदींनी घेतली परिस्थितीची माहिती

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – कोरोना व्हायरसच्या मुद्यावर पंतप्रधान कार्यालयाची (पीएमओ) आढावा बैठक घेण्यात आली. गुरुवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बैठकीत कोरोना व्हायरसशी संबंधित प्रकरणांची माहिती घेतली. तसेच यामुळे उद्योग-व्यवसायांना झालेल्या नुकसानीची माहिती घेण्यात आली. दरम्यान, चीनमध्ये प्राणघातक कोरोना विषाणूमुळे मृतांचा आकडा 2,118 वर पोहोचला आहे. यासह, संक्रमणाची एकूण पुष्टी केलेली प्रकरणे वाढून 74,576 वर गेली आहेत. यासंबंधित माहिती चिनी अधिकाऱ्यांनी गुरुवारी दिली.

डिसेंबरमध्ये संसर्गाची पहिली नोंद :
चीनच्या राष्ट्रीय आरोग्य आयोगाने (एनएचसी) म्हटले आहे की, कोरोना विषाणूच्या संसर्गाच्या नोंद होणाऱ्या प्रकरणांत घट झाली असून 394 प्रकरणे समोर आली आहेत. डिसेंबरमध्ये या संसर्गाची पहिली नोंद झाली. तेव्हापासून हा आकडा सर्वात कमी आहे.

एनएचसीने सांगितले की, बुधवारी 31 प्रांतीय पातळीवरील भागांत 114 जणांचा मृत्यू झाला. चीनमध्ये एकूण 74,576 रुग्णांची पुष्टी झाली आहे आणि या प्राणघातक रोगामुळे 2,118 लोकांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, आयोगाने सांगितल्याप्रमाणे 4,922 लोकांना या विषाणूचा संसर्ग झाल्याचा संशय आहे. त्यांनी सांगितले कि, हुबेई येथे 108 आणि हेबई, शांघाय, फुजियान, शनदोंग, युन्नान आणि शानक्सी येथे प्रत्येकी एक मृत्यू झाला.