वाहतुकीचा खोळंबा करणाऱ्या ‘त्या’ पीएमपी बसला ५ हजारांचा दंड !

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – सातारा रस्ता बीआऱटी मार्गावर धनकवडी येथे एकामागे एक अशा बंद पडलेल्या ३ पीएमपी बसेसमुळे रविवारी दुपारी दोनच्या सुमारास प्रचंड वाहतुक कोंडी झाली होती. त्यानंतर बराच वेळ या बसेस मार्गातून न काढल्याने वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. त्यामुळे वाहतुकीचा खोळंबा झाल्याने वाहतुक पोलिसांनी यातील एका बसला ५ हजार रुपयांचा दंड पीएमपीकडून वसूल केला आहे.

पीएमपी बसेसचे ब्रेक डाऊन पुणेकरांसाठी नवीन नाही. सततच्या ब्रेकडाऊन आणि अपघातांमुळे पुणेकर पीएमपीला वैतागले आहेत. दरम्यान पीएमपीच्या बसेस रस्त्यात बंद पडल्याने वाहतुक कोंडीही नित्याचीच आहे. त्यामुळे पुणेकरांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागतो. रविवारी दुपारी वाढत्या तापमानामुळे तीन पीएमपी बस सातारा रस्त्यावर बंद पडल्या होत्या. त्यामुळे वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या.

वाहतुक पोलिसांकडून नियम मोडणाऱ्यांवर कारवाई करण्यात येत आहे. त्यावेळी बंद पडलेल्या पीएमपी बस रस्त्यावरून बाजूला केल्या नाहीत त्यामुळे अनेक वाहनचालकांना उन्हात रस्त्यावर तासभर अडकून राहावे लागले. दरम्यान रस्त्यात बंद पडलेल्या पीएमपी बसेसमुळे वाहतुकीला अडथळा झाल्यास त्या बसला दंड ठोठावण्याचे धोरण पुणे पोलिसांनी अवलंबिले आहे. त्यामुळे बंद पडलेल्या बसपैकी एक बस वेळेत बाजूला न घेतल्याने त्या बसला ५ हजार रुपये दंड ठोठावण्यात आला.