काय सांगता ! होय, पुण्यातील कात्रज चौकात विना चालक धावली PMPML ‘बस’

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – कात्रज येथील चौकात बसचालक हेंडब्रेक लावून कंडक्टरला बोलवायला गेला आणि कोणाला काही समजायच्या आत बस उतारावरुन वेगाने पुढे जाऊ लागली. तिने वाटेत दोन रिक्षांना धडक दिली. चालकाविना पुढे जात असलेली बस पाहून एका युवकाने धाडस करुन चालता बसमध्ये प्रवेश केला व बस थांबविली. युवकाच्या धाडसामुळे मोठी दुर्घटना टळली असून अनेकांचे प्राण वाचले. ही घटना मंगळवारी सकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास कात्रज डेपो येथील चौकाजवळ घडली.

याबाबतची माहिती अशी, पीएमपीची फुलेनगर ते कात्रज ही बस सकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास कात्रज डेपोसमोर आली. बसमधील प्रवासी उतरल्यानंतर चालकाने गाडी उभी केली. तोही बसमधून उतरुन गेला. बसमध्ये कोणीही नसताना अचानक बस उतारावर जाऊ लागली. बसमध्ये कोणी नसताना बस चालू लागल्याचे पाहून आजू बाजूच्या लोकांनी एकच आरडाओरडा करण्यास सुरुवात केली. पण तोपर्यंत बसने वेग घेतला होता. तिने रस्त्याच्याकडेला असलेल्या दोन रिक्षांना धडक देऊन पुढे जात होती.

लोकांचा आवाज ऐकून एक टॅक्सीचालक धावत बसमधील मागील दरवाजातून आत चढला. त्याने चालकाच्या केबिनमध्ये जाऊन ब्रेक दाबून गाडी थांबविली. कात्रज चौकापासून काही मीटर अंतरावर बस थांबविण्यात यश आल्याने मोठा अनर्थ टळला. बस आणखी पुढे गेली असती तर तिचा वेग वाढला असता व तिने चौकात येणाऱ्या जाणाऱ्या अनेक वाहनांना धडक दिली असती. त्यात काहींच्या प्राणावरही बेतू शकले असते. पीएमपी ठेकेदाराची ही बस असून बसचालकाने हँड ब्रेक लावला होता का की ब्रेक निकामी झाले आहेत, याची तपासणी करण्यात येणार आहे.