पुण्यात PMP बस धावणार, जाणून घ्या कोणा-कोणाला करता येणार प्रवास

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – पुण्यात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात झाला आहे. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी प्रशासनाने कडक निर्बंध लागू केले आहेत. शहरामध्ये अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व व्यवसाय बंद करण्यात आले आहे. कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याने पीएमपी सेवा बंद करण्यात आली होती. मात्र आता अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांची वाहतूक करण्यासाठी पीएमपीने 114 बसेस रस्त्यावर उतरवल्या आहेत.

पीएमपीने रस्त्यावर आणलेल्या 114 बसेस 57 मार्गांवर धावणार आहेत. पुणे शहर, पिंपरी चिंचवड आणि जिल्ह्यातील अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना या बसधून प्रवास करता येणार आहे. ही बस सेवा सकाळी 6 ते रात्री 8.30 पर्यंत सुरु राहणार आहे. घरेलू कामगार, बाहेर गावाहून येणारे प्रवासी, रुग्णांचे नातेवाईक आणि लसीकरणासाठी जाणाऱ्या नागरिकांना या बसमधू प्रवास करता येणार आहे. ही सेवा आज (शुक्रवार) पासून सुरु करण्यात आली आहे.

कोणाला बसमधू प्रवास करता येणार

पीएमपीच्या या बसमधून दोन्ही महापालिकांचे कर्मचारी, विभागीय आयुक्त कार्यालय, जिल्हाधिकारी कार्यालय, कँटोन्मंट बोर्ड, कामगार आयुक्त कार्यालय, पीएमआरडीए, जिल्हा परिषद, खासगी रुग्णालये, अन्न व औषध, मेडिकल असोसिएशन, रेल्वे, पोलिस, बँका, अग्निशमन दल, महावितरण, पत्रकार, सुरक्षा दल, कृषी उत्पन्न बाजार समितीचे कर्मचारी, एसटी महामंडळाचे कर्मचारी, घरेलू कामगार, रुग्णांचे नातेवाईक, लसीकरणासाठी जाणारे नागरिक इत्यादींना ही बससेवा उपलब्ध होईल, अशी माहिती पीएमपीचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक डॉ. राजेंद्र जगताप यांनी दिली.

शासनाचे नियम पाळणे बंधनकारक

पुणे स्टेशन, शिवाजीनगर, स्वारगेट येथे बाहेरगावाहून येणाऱ्या प्रवाशांना या बसमधून प्रवास करता येईल. बसमधून प्रवास करताना प्रवाशांना शासनाने दिलेल्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे लागेल. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांना बसमध्ये प्रवेश दिला जाणार नाही. तसेच बसमधू प्रवास करणाऱ्या प्रत्येक प्रवाशाला मास्कचा वापर करणे बंधनकारक असेल, असेही डॉ. जगताप यांनी सांगितले.

कुठून सुटणार बसेस

पीएमपीच्या बसेस स्वारगेट, नरवीर तानाजी वाडी, कोथरुड, कात्रज, हडपसर, निगडी, भोसरी, पिंपीर इत्यादी आगारातून ही बस दर अर्धा ते एक तासाल सोडण्यात येईल. त्यासाठी 57 मार्ग निश्चित करण्यात आले आहेत. पुणे महापालिका येथील पास केंद्र आणि पिंपरी चिंचवड महापालिकेजवळ लोखंडे सभागृह येथील पास केंद्र सकाळी 7 ते दुपारी 2 या वेळेत सुरु राहणार आहे. अशी माहिती पीएमपीचे वाहतूक व्यवस्थापक दत्तात्रेय झेंडे यांनी दिली.