पीएमपी जळीत प्रकरणी पीएमपीच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांवर गुन्हा

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – पुण्यात मागील काही महिन्यांमध्ये चालत्या पीएमपी बसेसने पेट घेतल्याच्या घटना घडल्या आहेत. यातील सोलापूर रस्त्यावर बसने पेट घेतल्याप्रकरणी घटनेत बसच्या अंतर्गत यांत्रिक सुरक्षेची जबाबदारी असताना त्याकडे दूर्लक्ष कर प्रवाशांचा जीव धोक्यात घातल्याप्रकरणी वानवडी पोलिसांनी हडपसर आगाराचे कार्यशाळा अधीक्षक व दोन फिटरांवर गुन्हा दाखल केला आहे. कार्यशाळा अधीक्षक मनोहर पिसाळ, फिटर गोरखनाथ विश्वनाथ भोसले आणि कैलास नारायण गव्हाणे (हडपसर आगार) अशी गुन्हा दाखल केलेल्यांची नावे आहेत.

याबाबतची माहिती अशी, हडपसर ते कात्रज कोंढवा ही मार्ग क्रमांक २९१ ची बस (एम एच १२/ ई़ क्यु ७७९६) ही १७ डिसेंबर २०१८ रोजी सोलापूर महामार्गाने रामटेकडी चौकातून जात होती. त्यावेळी प्रवासी चढत व उतरत असताना रामटेकडी चौकात बसच्या इंजिनमधून धूर येऊन बसने पेट घेतला. चालकाने ही बस रामटेकडी चौक पास करुन बीआरटी मध्येच थांबविली. प्रवासी खाली उतरले आणि बस मोठ्या प्रमाणावर पेटली. त्यामुळे बसच्या पुढील भागामधील केबीन, टायर, बाक, तसेच इंजीनचा भाग व पत्रा जळाला होता. अग्निशमन दलाच्या जवानांनी तातडीने आग विझवली होती. यात सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. पोलिसांनी पंचनामा करुन चालकाचा जबाब नोंदवत अकस्मात जळीत अशी नोंद केली होती. गेल्या साडेतीन वर्षात पीएमपीच्या सुमारे २१ हून अधिक बसेसना आग लागून त्यात बसमधील प्रवाशांचा जिविताला धोका उत्पन्न झाला आहे. या घटनांमुळे प्रवाशांमध्ये भितीचे वातावरण निर्माण होते.

वारंवार पीएमपी बसेसना आग लागण्याच्या घटना घडत असल्याने याचे गांभीर्य ओळखून अपर पोलीस आयुक्त सुनिल फुलारी, पोलीस उपायुक्त प्रकाश गायकवाड व सहायक आयुक्त मिलिंद पाटील असून त्याची सखोल चौकशी करण्याचे आदेश दिले. वानवडीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सयाजी गवारे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक बागूल यांनी याप्रकरणाची चौकशी केली. त्यावेळी मुख्य अग्निशमन अधिकारी, पीएमपीचे अपघात विभागाचे निरीक्षक आणि हडपसर आगार वर्कशॉपचे व्यवस्थापक यांना पत्रव्यवहार करुन माहिती घेण्यात आली. त्यात रामटेकडी येथे घडलेल्या घटनेत बसच्या इंजीन बोनेटच्या आतील बाजूस स्टार्टरजवळ वायरिंगचा शॉर्टसर्किट होऊन लागल्याचे निष्पन्न झाले. त्याप्रमाणे बसची अंतर्गत यांत्रिक सुरक्षितेतेची कायदेशीर जबाबदारी कार्यशाळा अधीक्षक तसेच फिटर यांची असताना त्यांनी यांत्रिक बाबींकडे दुर्लक्ष व बेजाबदारपणा केल्यामुळे ही घटना घडली असल्याचे फिर्यादींचे मत झाले़. त्यावरुन कार्यशाळा अधीक्षक व दोघा फिटरांविरुद्ध भादवि क्ऱ ३३६, ३८७ तसेच मोटार वाहन अधि़ १९८८ चे कलम १९० प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.