पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – PMP Premium Services | पीएमपी प्रशासनाने प्रवाशांसाठी ‘प्रीमियम सेवा’ सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे प्रवाशांना आता कमी वेळेत इच्छित स्थळी पोहोचता येणार आहे. यामध्ये सेवा देणारी बस वातानुकूलित असून, पहिल्यांदाच ‘टॅप’ची सुविधा देण्यात येत आहे. पुणे स्टेशन ते हिंजवडी, येरवडा ते खराडी मार्गावर धावणाऱ्या बसमध्ये ही सेवा प्राथमिक टप्प्यात सुरू केली जाईल. ही विनावाहक सेवा असून, येत्या महिनाभरात सुरू होणार आहे.
खासगी वाहनांनी प्रवास करणारे अथवा ऑनलाइन कंपन्यांच्या वाहनांतून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना आपल्याकडे आकृष्ट करण्यासाठी पीएमपी प्रशासनाने ‘प्रीमियम सेवा’ देण्याचा निर्णय घेतला आहे. नोकरदारवर्ग डोळ्यांसमोर ठेवून सेवा सुरू केली जात आहे.
प्रवाशांना कमी वेळेत कामाच्या ठिकाणी पोहोचणे अपेक्षित असते. त्यासाठी प्रीमियम सेवा देणाऱ्या बसच्या मार्गावर कमीत कमी थांबे असतील. शिवाय बसमध्ये वाहक असणार नाही. अन्य बसच्या तुलनेत वाहतूक अधिक जलद असेल. त्यामुळे प्रवाशांचे किमान २५ ते ३० मिनिटे वाचतील, असा दावा पीएमपी प्रशासनाने केला आहे.
‘पीएमपी’ प्रशासन पहिल्यादांच बसमध्ये प्रवाशांसाठी ‘टॅप’ची सुविधा उपलब्ध करत आहे. प्रवाशांकडे असलेले कार्ड मशिनवर ‘टॅप’ करून तिकीट काढले जाते. बसमधून उतरण्यापूर्वी टॅप करून तिकीट काढता येणार आहे. तसेच बसमध्ये वाहक नसल्याने प्रवाशांना तिकीट काढण्यासाठी अन्य दोन पर्याय देखील उपलब्ध असतील. यात प्रवासी ऍपच्या माध्यमातूनही तिकीट काढू शकतील. दुसरे म्हणजे बस सुटण्यापूर्वी थांब्याजवळ असलेल्या वाहकांकडून तिकिटाची खरेदी करता येऊ शकते.
“पीएमपी प्रशासन लवकरच प्रीमियम सेवा सुरू करत आहे. ही सेवा विनावाहक असणार असून, मार्गावरचे थांबेदेखील तुलनेने कमी असणार आहेत. प्रवाशांना जलद प्रवासाचा अनुभव या सेवेतून मिळणार आहे” अशी माहिती पीएमपी सहव्यवस्थापकीय संचालक नितीन नार्वेकर यांनी दिली आहे.
इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा
https://www.instagram.com/policenamaa/?hl=en#
Nana Patole | ‘महायुती सरकारने महाविकास आघाडीला विरोधी पक्षनेते पद द्यावे’ : नाना पटोले
Mundhwa Pune Crime News | मुंढव्यात नेमके चाललय तरी काय? परिसरातील कायदा सुव्यवस्था ‘रामभरोसे’ !