ब्रेक निकामी झाल्याने बस हॉटेलमध्ये घुसल्याप्रकरणी चालकाचे निलबंन

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – सिंहगड महाविद्यालयाच्या उतारावर बसचे ब्रेक निकामी झाल्याने ती थेट एका हॉटेलमध्ये घुसली होती. याप्रकरणात पीएमपी प्रशासनाने अजब न्याय केला आहे. प्राथमिक तपासाअंती बसचालक दोषी आढळल्याने त्याला निलंबित केले असून तांत्रिक विभागाला नोटीस देऊन खुलासा करण्याचे सांगण्यात आले आहे, अशी माहिती पीएमपीएल प्रशासनाकडून देण्यात आली.

सोपान शिवराम जांभळे असे बसचालकाचे नाव आहे. सिंहगड महाविद्यालयाच्या बसथांब्याहून सायंकाळी पावणे चारच्या सुमारास बसचालक सोपान शिवराम जांभळे आणि वाहक मोहन दहिवळ हे बस घेऊन स्वारगेटकडे जाण्यासाठी निघाले. त्यावेळी सिंहगड महाविद्यालायाचा थांबा सोडल्यानंतर बस वडगाव बु. कडे जाणाऱ्या उतारावर आली. त्यावेळी या उतारावर खाली येताना बसने अचानक वेग धरला. चालकाने ब्रेक लावण्याचा प्रयत्न केला. तेव्हा बसचे ब्रेक निकामी झाल्याचे लक्षात आले. त्यानंतर बसचालक जांभळे यांनी प्रसंगावधान दाखवत बस रस्त्याच्या बाजूला असलेल्या कठडल्याला धडकवली. परंतु उतार असल्याने आणि गाडीचा वेग नियंत्रित होत नसल्याने ती कठड्याला धड़कून हॉटेलमध्ये शिरली. त्यानंतर ती थांबली. सुदैवाने हॉटेलमध्ये जास्त लोक नव्हते. तसेच बसमध्येही जास्त गर्दी नव्हती.

याप्रकरणी पीएमपी प्रशासनाने प्राथमिक चौकशी केली असून या घटनेत चालक दोषी ठरत आहे. त्यामुळे त्याच्यावर कारवाई करण्यात आली आहे. त्यासोबतच तांत्रिक विभागाला नोटीस देऊन खुलासा करण्याचे सांगण्यात आले आहे.