थेऊर येथील ‘अवैध’ बांधकामावर PMRDA चा ‘हातोडा’ !

लोणी काळभोर : पोलीसनामा ऑनलाइन (शरद पुजारी) – पूर्व हवेलीत पुणे महानगर प्रादेशिक विकास प्राधिकरणकडून अवैध व अनियमित बांधकामावर कारवाईला सुरुवात झाली असून गणेशवाडी थेऊर येथे चालू असलेले एक बाधकाम या प्राधिकरणाने जमीनदोस्त केले आहे. यामुळे अवैध बांधकाम करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.

पुणे शहराचा विकास होत असताना शहरालगतच्या गावामध्ये जमिनीवर अनधिकृत प्लाॅटींग फोफावले आहे. यात सर्वसामान्य नागरिकांना अनेक सवलतीचे आमिष दाखवून हा धंदा जोरात चालू आहे. सध्या पूर्व हवेलीतील बहुतेक सर्वच गावात हा व्यवसाय मोठ्या प्रमाणावर आहे. परंतु या अस्ताव्यस्त वाढणाऱ्या घरांवर पुणे महानगर प्रादेशिक विकास प्राधिकरण यांच्यावतीने नियंत्रण ठेवले जाते. अलिकडे याकडे विशेष लक्ष दिले जात असल्याचे दिसून येत आहे. आज बुधवारी थेऊर येथील गणेशवाडीतील सर्वे नं.903 मधील अनधिकृत कलम बांधकाम कलम 53 (1) नुसार जमीनदोस्त करण्यात आले. या अगोदर त्यांना कायदेशीर नोटीस बजावण्यात आली होती. आज यावर प्रत्यक्ष अमलबजावणी केली.

आज झालेल्या कारवाईमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून अवैध बांधकाम व प्लाॅटींगवाल्याचे धाबे दणाणले आहेत. आणखी या परिसरात अनेकांना अशा नोटीसा बजावण्यात आल्या असून यावर कधी व कशी कारवाई होणार हे लवकरच कळेल.

अवैध बांधकामासंदर्भात स्थानिक स्वराज्य संस्थांना तसेच महावितरण यांनाही कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. यामुळे भविष्यात बांधकामावर पीएमआरडीए नजर ठेवणार हे निश्चित.

Visit : Policenama.com