पोलिस भरतीच्या चाचणी दरम्यान चार तरुणींना कारने उडवले!

मुंबई : पोलीसनामा आॅनलाईन
राज्य पोलीस दलाच्या पोलीस भरती प्रक्रियेदरम्यासन चार तरुणींना मोटारीने उडवल्याची धक्कादायक घटना मुंबईतील विक्रोळीत घडली आहे. भरती प्रक्रियेतील धावण्याची चाचणी पूर्व द्रुतगती मार्गावरच्या सर्व्हिस रोडवर घेतली जात होती. याच ठिकाणी आज सकाळी अकराच्या सुमारास पोलीस भरती प्रक्रिया झाल्यानंतर विक्रोळी स्थानकाकडे जाताना चार तरुणींना टाटा झेन गाडीने उडवले. यात चारही तरुणी गंभीर जखमी झाल्या असून, त्यांना विक्रोळी येथील पालिकेच्या महात्मा फुले रुग्णालयात दखल करण्यात आले आहे.

काजल करडे, दीपाली काळे, चित्राली पांगे, चैताली दोर्गे अशी अपघातात जखमी झालेल्या तरुणींची नावे असून, पुण्याच्या शिरुरमध्ये असलेल्या शिरोळे अकादमीच्या या सर्व तरुणी आहेत. यातील दीपाली काळेला जास्त दुखापत झाल्यामुळे तिला सायनच्या टिळक रुग्णालयात हलवण्यात आले आहे. तर वाहन चालकाला विक्रोळी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. तसेच पोलिस भरतीदरम्यान सकाळी याच ठिकाणी हिटस्ट्रोकमुळे दोन महिला उमेदवार देखील चक्कर येऊन पडल्या होत्या. त्यांना देखील महात्मा फुले रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांच्यावर उपचार करुन त्यांना घरी सोडण्यात आले आहे.