PNB मध्ये विलिनीकरण होणार्‍या ‘ओरिएंटल’ आणि ‘युनायटेड’ बँकेच्या ग्राहकांना करावी लागणार ‘ही’ 6 महत्वाची कामे !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – सरकारी बँक असलेली पंजाब नॅशनल बँकेत ओरिएंटल बँक ऑफ कॉमर्स आणि युनायटेड बँक ऑफ इंडियाचे विलीनीकरण करण्यात येणार आहे. यासाठी पंजाब नॅशनल बँकेच्या बोर्डाने मंजुरी दिली आहे. त्यानंतर पंजाब नॅशनल बँक हि देशातील दुसऱ्या क्रमांकाची मोठी बँक ठरणार आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी मागील आठवड्यात अनेक बँकांच्या विलीनीकरणाची घोषणा केली आहे. त्यामुळे आता सरकारी बँकांची संख्या 27 वरून 12 वर येणार आहे. मात्र तुमचे जर या दोन बँकांमध्ये खाते असेल तर तुम्हाला हि 6 महत्वाची कामे करावी लागणार आहेत.

हि आहेत सहा महत्वाची कामे

1) खाते क्रमांक आणि इंटरनेट कस्टमर ID होणार बदली

या दोन बँकांचे PNB मध्ये विलीनीकरण झाल्यानंतर सर्व ग्राहकांना नवीन खाते क्रमांक आणि कस्टमर ID मिळणार आहे. त्यामुळे बँक यासंदर्भातील माहिती तुम्हाला ई-मेल किंवा मोबाईलवरून मेसेजच्या रूपात पाठवेल.

2) चेकबुक बदलणार

दोन बँकांपैकी कोणत्याही बँकेत तुमचे खाते असेल तर तुम्हाला तुमचे चेकबुक बदलून घ्यावे लागणार आहे. काही दिवसांसाठी हे वैध असणार आहे मात्र नंतर तुम्हाला ते PNB चे घ्यावे लागणार आहे.

3) या जागेवर करावे लागणार बदल

खाते क्रमांकात बदल झाल्यानंतर तुम्हाला सर्व ठिकाणी याची माहिती द्यावी लागणार आहे. आयकर विभाग, विमा कंपनी तसेच म्यूचुअल फंड आणि नॅशनल पेमेंट सिस्टीम सारख्या विभागांमध्ये देखील तुम्हाला नवीन खाते क्रमांक तसेच माहिती जमा करावी लागणार आहे.

4) नवीन ECS, SIP साठी करावे लागणार बदल

बदल झाल्यानंतर तुम्हाला तुमच्या ECS, SIP मध्ये देखील बदल करावे लागणार आहेत. त्याचबरोबर विमा कंपन्यांमध्ये देखील तुम्हाला याची माहिती द्यावी लागणार आहे. ECS, SIP साठी तुम्हाला नवीन फॉर्म भरावा लागणार आहे.

5) बदलू शकतो बँकेचा पत्ता

विलीनीकरण झाल्यानंतर तुम्हाला नवीन शाखेत समाविष्ट केले जाऊ शकते. त्यामुळे तुमचा पत्ता बदलू शकतो. त्यामुळे तुम्हाला यासाठी सतर्क राहावे लागणार आहे.

6) डिपॉजिट तसेच लँडिंग दरात बदल नाही

यामध्ये कोणत्याही प्रकारचा बदल होणार नसून यामध्ये जुन्या बँकेत मिळणाऱ्या दरांवरच तुम्हाला या बँकेत देखील सेवा मिळणार आहे. त्याचबरोबर गृह कर्जावरील व्याजदरांमध्ये देखील कोणतेही बदल होणार नाहीत.

18,000 कोटी रुपये गुंतवणूक

या विलीनीकरणासाठी पंजाब नॅशनल बँकेच्या अधिकाऱ्यांनी परवानगी दिली असून यासाठी 18,000 कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याची देखील तयारी दर्शवली आहे. त्याचबरोबर सरकार देखील यासाठी बँकेला 16,000 कोटी रुपये देणार आहे.