PNB ला पुन्हा लागला 3,688 कोटी रुपयांचा चुना, DHFL ला दिलेलं कर्ज फ्रॉड म्ह्णून घोषित

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –  सार्वजनिक क्षेत्रातील पंजाब नॅशनल बँकेला (पीएनबी) पुन्हा एकदा कर्ज घोटाळ्याचा सामना करावा लागत आहे. बँकेने दीवान हाउसिंग फायनान्स लि.(डीएचएफएल) ला दिलेल्या 3,688.58 कोटी कर्जाला फ्रॉड घोषित केले आहे. याआधी नीरव मोदी आणि मेहुल चोकसी यांनी बँकेला 14 हजार कोटींपेक्षा जास्त रुपयांचा चुना लावला होता. बँकेने गुरुवारी सांगितले की, त्याने दीवान हाउसिंग फायनान्स लि. (डीएचएफएल) च्या एनपीए (नॉन-परफॉर्मिंग अ‍ॅसेट) खात्यात 3,688.58 कोटी रुपयांच्या फसवणूकीबद्दल आरबीआयला माहिती दिली आहे. दरम्यान अनेक कंपन्यांमार्फत बँक कर्जाच्या एकूण 97,000 हजार कोटींपैकी 31,000 कोटी रुपयांचा घोटाळा केल्याच्या अहवालानंतर डीएचएफएल चर्चेत आले.

शेअर बाजाराला दिली माहिती

वृत्तसंस्था पीटीआयच्या वृत्तानुसार पीएनबीने शेअर बाजाराला माहिती दिली आहे की, “कंपनीच्या (डीएचएफएल) खात्यात 3,688.58 कोटी रुपयांच्या फसवणूकीचा अहवाल आरबीआयकडे आला आहे.” ते म्हणाले की, बँकेने यापूर्वी निश्चित निकषानुसार 1,246.58 कोटी रुपयांची तरतूद केली आहे. कर्ज निराकरण करण्याबाबत एनसीएलटीशी संपर्क साधणारी डीएचएफएल ही पहिली वित्तीय सेवा कंपनी आहे. गेल्या वर्षी कंपनीत नियमांचे उल्लंघन केल्याच्या वृत्तानंतर एसएफआयओसह (सीरियस फ्रॉड इन्व्हेस्टिगेशन ऑफिस) विविध एजन्सींनी तपास सुरू केला.

अनेक घोटाळ्यांमध्ये सामील आहे डीएचएफएल

हीच कंपनी आहे, जिची येस बँकेच्या कर्ज घोटाळ्यासाठी चौकशी सुरु आहे. कंपनीचे प्रवर्तक वाधवन बंधूना अटक करण्यात आली असून अंमलबजावणी संचालनालयाने त्यांची संपत्ती गुरुवारी संलग्न केली आहे. येस बँक कर्ज घोटाळा प्रकरणात, अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) माजी बँक प्रमुख राणा कपूर आणि डीएचएफएलचे प्रवर्तक कपिल वाधवन आणि धीरज वाधवन यांच्याकडे 2400 कोटी रुपयांची मालमत्ता जोडली आहे. यामध्ये राणा कपूरचे 1000 कोटी आणि वाधवन बंधूंचे 1400 कोटी रुपयांची मालमत्ता समावेश आहे.