नीरव मोदीच्या भारतात आणण्याचा मार्ग मोकळा, UK च्या गृहमंत्र्यांनी दिली मंजुरी

लंडन : वृत्तसंस्था – पंजाब नॅशनल बँक घोटाळा प्रकरणातील मुख्य आरोपी हिरे व्यापारी नीरव मोदी याच्या भारतात प्रत्यार्पणाचा मार्ग मोकळा झाला आहे. इंग्लंडच्या गृहमंत्रालयाने त्याला भारताकडे सोपवण्यास हिरवा कंदील दाखवला आहे. सीबीआयने यासंदर्भात माहिती दिली आहे. नीरव मोदी घोटाळा करुन जानेवारी 2018 मध्ये भारतातून फरार झाला होता. त्यानंतर त्याला मार्चमध्ये लंडन येथे अटक करण्यात आली होती. तेव्हापासून तो वेस्ट लंडनमधील वॉड्सवर्थ तुरुंगात आहे. भारताने नीरव मोदी फरार झाल्यापासून त्याला भारतात आणण्यासाठी प्रयत्न सुरु केले होते. हे प्रकरण त्यानंतर न्यायालयात गेले. 25 फेब्रुवारी रोजी ब्रिटनच्या न्यायालयाने नीरव मोदीला भारताकडे सोपवण्याचा निर्णय दिला होता. आता गृहविभागाने नीरव मोदीला भारताकडे सोपवण्यास मंजूरी दिली आहे.

पंजाब नॅशनल बँकेतील काही अधिकाऱ्यांच्या मदतीने तब्बल 13 हजार 600 कोटी रुपयांचा घोटाळा करुन फरार झालेला हिरे व्यापारी नीरव मोदीला भारतात पाठवण्यात येईल, हे अलीकडेच नक्की झाले होते. ब्रिटनच्या न्यायालयामध्ये प्रत्यार्पण खटल्यात नीरव मोदीला अपयश आले होते. त्याच्यावरील आर्थिक घोटाळा आणि मनी लाँड्रिंगच्या आरोपात तथ्य आहे, असेही न्यायालयाने म्हटले होते. तसेच आरोपात तथ्य असल्यामुळे नीरव मोदीला भारतीय न्यायालयाचे दार ठोठवावे लागेल, असेही ब्रिटनच्या न्यायालयाने स्पष्टपणे म्हटले होते.

नीरव मोदीने साक्षीदारांना धमकावण्याचा आणि पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केला होता, असे देखील न्यायालयाने म्हटले होते. खटल्याचा निकाल सुनावण्यात आला, तेव्हा व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे नीरव मोदी उपस्थित होता. पण निकालानंतरही तो अतिशय निर्विकार होता. निकाल ऐकून त्याच्या चेहर्यावरील रोषही हलली नाही. जिल्हा न्यायाधीश सॅम्युएल गुझी यांनी निकालाचा काही भाग न्यायालयात वाचून दाखवला. ते म्हणाले की, आपण पूर्ण निकालपत्र गृहमंत्रालयाकडे पाठवत आहे.

मुंबईतील ऑर्थर रोड तुरुंगात राहणार
नीरव मोदीला भारतात आणल्यानंतर त्याला मुंबईतील ऑर्थर रोड तुरुंगात ठेवण्यात येणार आहे. ऑर्थर रोड तुरुंगात एक विशेष सेल तयार ठेवण्यात आला आहे. मोदीला बराक क्रमांक 12 मध्ये असलेल्या तीन पैकी एका सेलमध्ये ठेवण्यात येणार आहे. ऑर्थर रोड तुरुंगातील बराक क्रमांक 12 हा अतिसुरक्षित समजला जातो.