शरद पवारांविषयी बेताल वक्तव्य करणाऱ्या चारोळीकारांचा अखेर माफीनामा 

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – सध्याचे राजकीय वातावरण पाहता राजकीय नेत्यांची एकमेकांवर चिखलफेक सुरु आहेच पण नेत्यांनी बोललेल्या वक्तव्यांची सोशल मीडियावर सर्रास खिल्ली उडवली गेल्याचे अनेकदा पाहायला मिळले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याविषयी आक्षेपार्ह कमेंट केल्याबाबदल चारोळीकार चंद्रशेखर गोखले यांनी माफी मागितली आहे. त्यांनी त्यांच्या फेसबुक पोस्ट वरून आक्षेपार्ह कमेंट केल्याबद्दल  माफी मागितली आहे.

भाजपने बारामतीची जागा जिंकल्यास लोकांचा निवडणूक प्रक्रियेवरील विश्वास उडेल. असा दावा शरद पवार यांनी एका मराठी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीदरम्यान केला  होता. यासंदर्भातली बातमी वाचून या बातमीच्या खाली चारोळीकार चंद्रशेखर गोखले यांनी शरद पवार यांच्याबद्दल आक्षेपार्ह कमेंट केली होती. त्यानंतर राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनीही याबाबत ट्वीट करत चंद्रशेखर गोखले यांनी माफी मागावी, अशी मागणी केली होती. तसेच सोशल मीडियावर अनेकांनी संताप व्यक्त केला होता.

नक्की काय म्हणाले होते चंद्रशेखर गोखले

‘बारामती जिंकण्याच्या भाजपच्या दाव्यानंतर शरद पवारांचं धक्कादायक विधान’ असा संबंधित बातमीचा मथळा होता. त्यावर ‘मी वाचलं धक्कादायक निधन देव त्यांच्या आत्म्याला सॉरी सॉरी देव त्यांना उदंड आयुष्य देवो’ असं भाष्य चंद्रशेखर गोखले यांनी केलं होतं.

गोखले यांचा माफीनामा

त्यानंतर, ‘मी चंद्रशेखर गोखले मनापासून तुम्हा सर्वांची क्षमा मागतो. पवार साहेबांबद्दल असे विधान करायची खरच मला गरज नव्हती तरी माझ्या हातून ही आगळीक घडली प्लीज समजून घ्या’ अशा शब्दात चंद्रशेखर गोखलेंनी बुधवारी रात्री माफी मागितली.