Beed : खळबळजनक ! गोकुळाष्टमीच्या उपवासाच्या भगरीतून 100 जणांना विषबाधा

बीड : पोलीसनामा ऑनलाइन –   गोकुळाष्टमीला उपवासाची भर खाल्यानेत तब्बल 100 जणांना विषबाधा झाल्याची खळबळजनक घटना गेवराई तालुक्यातील तळणेवाडी येथे घडली आहे. त्यामुळे तालुक्यात मोठी खळबळ उडाली आहे. संबंधितांना उलटी, मळमळ होऊ लागल्याने गेवराई येथील एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. तर काही रुग्णांना बीड रुग्णालयात जाण्यासाठी सांगण्यात आले आहे. दरम्यान, याची माहिती आरोग्य प्रशासनाला कळताच त्यांनी या रुग्णांना उपचारासाठी दाखल होण्याचे आवाहन केले आहे. विषबाधा झालेल्या रुग्णांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे.

गोकुळाष्टमीला अनेक जण उपवास धरतात. दरम्यान गेवराई तालुक्यातील धोंडराई पासून जवळच असलेल्या तळणेवाडी येथील नागरिकांनी गोकुळाष्टमी उपवासानिमित्त गावातीलच एका किराणा दुकानातून भगर खरेदी केली होती. भगरीचा भात खाल्ल्यानंत महिला, ग्रामस्थांना मळमळ, उलटी, जुलाब इत्यादी त्रास होऊ लागला. सायंकाळी चार नंतर गावातील जवळपास 100 हून अधिक जणांना त्रास जाणवू लागल्याने चांगलीच धांदल उडाली. त्रास होत असलेल्या रुग्णांना तातडीने गेवराई येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.

घटनेची माहिती मिळताच तालुका आरोग्य अधिकारी डॉ. संजय कदम यांनी तळणेवाडी येथे धाव घेऊन त्रास होणाऱ्या नागरिकांना उपजिल्हा रुग्णालयात उपचासाठी दाखल होण्याचे आवाहन केले. दरम्यान सरकारने या प्रकरणात लक्ष घालून चौकशी करावी आणि दोषींना शिक्षा करावी अशी मागणी होत आहे. भगरीचे नमुनेही तपासणीसाठी पाठवण्यात येणार आहेत.