४ हजार रुपयाची लाच स्विकारताना पोलीस अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात

नंदुरबार : पोलीसनामा ऑनलाइन – दाखल गुन्ह्यात मदत करण्यासाठी ४ हजार रुपयांची लाच स्विकारणाऱ्या पोलीस हवालदाराला अ‍ॅन्टी करप्शनच्या पथकाने रंगेहाथ पकडले आहे. ही कारवाई नंदुरबार जिल्ह्यातील उपनगर पोलीस ठाण्यात करण्यात आली.

बबन बापु पाटील(वय-५६) असे लाच स्विकारताना पकडण्यात आलेल्या पोलीस हवालदाराचे नाव आहे. याप्रकरणी पापनेर नारायणपूर येथील ३२ वर्षीय व्यक्तीने नंदुरबार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली आहे.

तक्रारदार यांच्यावर ऊपनगर पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा दाखल आहे. या गुन्ह्यामध्ये मदत करण्यासाठी बबन पाटील यांनी तक्रारदार यांच्याकडे ६ हजार रुपयांची लाच मागितली. तडजोडीमध्ये चार हजार रुपये देण्याचे ठरले होते. तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली. पथकाने पंचासमक्ष पडताळणी केली असता पाटील याने लाच मागितल्याचे निष्पन्न झाले.

पथकाने पोलीस ठाण्यात सापळा रचून चार हजार रुपयांची लाच स्विकारताना रंगेहाथ पकडले. नंदुरबार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपअधिक्षक शिरीष टी. जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संगिता पाटील यांच्या पथकाने केली.

सरकारी कामासाठी लोकसेवक लाचेची मागणी करीत असल्यास नागरिकांनी लाचलुचपत प्रतिबंध विभागाकडे तक्रार करावी, असे आवाहन लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या वतीने करण्यात आले आहे. तसेच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या १०६४ या हेल्प लाईन क्रमांकावर संपर्क साधावा.
Loading...
You might also like