माजी उपमहापौराच्या पतीच्या मटका अड्ड्यावर छापा ; महिला IPS अधिकाऱ्याच्या पथकावर हल्ला

कोल्हापूर : पोलीसनामा ऑनलाइन – कोल्हापूरातील यादवनगर पांजरपोळ येथील राष्ट्रवादीच्या माजी उपमहापौरांच्या पतीच्या मटका अड्ड्यावर छापा टाकण्यासाठी गेलेल्या प्रशिक्षणार्थी अपर पोलीस अधीक्षक ऐश्वर्या शर्मा यांच्यासह त्यांच्या पथकावर सुमारे ४०० जणांच्या जमावाने हल्ला केला. यावेळी सलिम यासिन मुल्ला याने ऐश्वर्या शर्मा यांचा बॉडीगार्ड निरंजन पाटील याचे कपडे फाडून त्यांच्या कंबरेचे सर्व्हिस पिस्तूल जबरदस्तीने हिसकावुन घेऊन त्याचा धाक दाखवून फरारी झाला. सोमवारी रात्री साडेआठ वाजता हा प्रकार घडला. याप्रकरणी माजी उपमहापौर शमा मुल्ला यांच्यासह १५ जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

यादवनगर परिसरात माजी महापौर शमा मुल्ला हिचा पती सलिम मुल्ला याचा मटका जोरात सुरु असल्याची माहिती पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांना समजली होती. त्यांनी प्रशिक्षणार्थी पोलीस अधीक्षक ऐश्वर्या शर्मा यांना छापा टाकण्याचे आदेश दिले. शर्मा या आपल्या १२ जणांच्या टीमला घेऊन सोमवारी रात्री साडेआठ वाजता यादवनगरला आल्या. सलिम मुल्लाच्या इंडियन ग्रुप नावाच्या कार्यालयात आणि त्याच्या पाठीमागील दुमजली इमारतीत मटका सुरु होता. सुमारे ४० जण जुगार खेळत होते. पोलिसांनी छापा घालून या सर्वांना एका रुममध्ये बसविले. कार्यालयाशेजारीच मुल्लाचे घर आहे. शर्मा घराची झडती घेण्यासाठी गेल्या असता शमा मुल्ला व सलिम मुल्ला यांनी कार्यकर्त्यांना फोन करुन बोलावून घेतले. काही वेळातच सुमारे ४०० जणांचा जमाव मुल्ला यांच्या घरासमोर जमला. त्या जमावाला पाहताच मुल्ला दाम्पत्याने थेट शर्मा यांच्यावर हल्ला चढविला. जमावाने पोलिसांना मारहाण करायला सुरुवात केली. शर्मा यांचा बॉडीगार्ड निरंजन पाटील याचे पिस्तूल काढून घेतले. पिस्तुल पोलिसांच्या दिशेने रोखून मुल्ला दाम्पत्यासह कार्यकर्त्यांनी तेथून पळ काढला.

या घटनेची माहिती ऐश्वर्या शर्मा यांनी पोलीस नियंत्रण कक्षाला कळविली. त्याबरोबर काही वेळात राजारामपूरी, लक्ष्मीपुरी, करवीर, जुना राजवाडा, शाहूपुरी यांच्याबरोबरच राज्य राखीव पोलीस दल, जलद कृती दलाचे जवान असा दोनशे जणांचा फौजफाटा घटनास्थळी दाखल झाला. त्यांनी शमा मुल्ला व सलिम मुल्ला यांच्यासह १५ जणांना ताब्यात घेतले.

मुल्ला याच्या घरासमोर सीसीटीव्ही कॅमेरे आहेत. त्याचे फुटेज पोलिसांनी ताब्यात घेतले. पोलिसांनी मुल्ला याच्या घराचे दरवाजे तोडून झडती घेतली. मटक्याची लाखो रुपयांची रोकडे, खासगी सावकारीच्या फाईली, मटक्याचे साहित्य, महत्वाची कागदपत्रे, ६ बँक पासबुक जप्त केली आहेत.

सलिम मुल्ला याच्यावर डझनापेक्षा अधिक मटका, सावकारीचे राजारामपुरी पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत. त्याच्यावर मोक्का कारवाई करण्यासाठी पोलिसांचा प्रस्ताव तयार आहे. तो रद्द करण्यासाठी मुल्ला दाम्पत्याने राजकीय संबंधाचा वापर केल्याने सध्या तो प्रलंबित ठेवण्यात आला आहे.