काय सांगता ! होय, गावठी दारूचा चक्क हातपंप, पाहून पोलिसही चक्रावले

जालना : पोलीसनामा ऑनलाइन – जालन्यामध्ये पाणी टंचाईमुळे शहरात अनेक ठिकाणी हातपंप बसवण्यात आले आहे. शहरातील नागरिकांची पाण्याची अडचण दूर करण्यासाठी हातपंप मोठ्या प्रमाणात बसवण्यात आले आहेत. परंतु जालन्यात गावठी दारूचा हातपंपही आहे, हे जर सांगितले तर कदाचीत तुमचा विश्वास बसणार नाही. मात्र, हे खरे आहे. जालना पोलिसांच्या दारूबंदी पथकाने केलेल्या छापेमारीत हा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. लोहार मोहल्ल्यात असलेल्या गावठी दारूचा हातपंप पाहून कारवाईसाठी गेलेले पोलीस अधिकारी देखील चक्रावून गेले.

जालना शहरातील लोहार महोल्ल्यात छुप्या पद्धतीने गावठी दारूची विक्री होत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांच्या पथकाने लोहार मोहल्ल्यात छापेमारी केली. परंतु पोलिसांना त्या ठिकाणी काहीच आढळून आले नाही. दरम्यान घराच्या एका खोलीतील फशीवर त्यांना छोटा हातपंप दिसला.

दरम्यान, पोलिसांनी त्याची तपासणी केली असता त्या फरशीखाली दारूचा हौद असून हातपंपाच्या सहाय्याने दारू बाहेर काढून त्याची विक्री केली जात असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. भूमिगत दारूचा हौद आणि हातपंप पाहून पोलीस अधिकारी देखील चक्रावून गेले.

पोलिसांनी केलेल्या या कारवाईत 93 हजार रुपयांची गावठी दारू जप्त केली आहे. याप्रकरणी सदर बाजार पोलीस ठाण्यात आरोपी बबन गायकवाड याच्यासह दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई पोलीस अधिक्षक एस. चैतन्य यांच्या मार्गदार्शनाखाली दारुबंदी पथकाचे पोलीस उपनिरीक्षक संपत पवार, सय्यद उस्मान, रामेश्वर बघाटे, सुरेश राठोड, आर.टी. वेलदोडे, रामा पेव्हरे, परमेश्वर धुमाळ, किशोर जाधव, अलका केंद्रे, रत्नमाला एडके आणि धोंडीराम मोरे यांच्या पथकाने केली.