नववर्षाच्या तोंडावर पोलिसांची मोठी कारवाई ; १० पिस्तूलं, ४० जिवंत काडतूसं जप्त

ठाणे : पोलीसनामा ऑनलाईन – नववर्षाच्या तोंडावर ठाणे पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. २ अट्टल गुन्हेगारांसह पोलिसांनी १० पिस्तूल, ४० जिवंत काडतूसे जप्त केली आहेत. खंडणी घेणे, सुपारी घेणे, हत्यार सप्लाय करण्याची कामं हे आरोपी करत असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. राज्यातील पिस्तूल सप्लाय करणारी ही टोळी असल्याचं पोलिसांकडून सांगण्यात आलं आहे. त्याचबरोबर राज्यातील अनेक मोठ्या व्यक्ती यांच्या टार्गेटवर असल्याचं पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

शोएब ईसाक शेख (वय-२१ रा. सावनी मगदापूर, अमरावती), रहिम हबीब शेख (वय-३२ रा. लालखडी, पठाण चौक रोड, अमरावती) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. आरोपींना अमरावती येथील हॉटेल शितल लॉजिंग अँण्ड पंचम रेस्टॉरंट या ठीकाणी सापळा रचून दुपारी दोनच्या सुमारास अटक करण्यात आली. नवीन वर्षाच्या सुरुवातीला मोठा हल्ला करण्याचा आणि घातपात घडवण्याचा या टोळीचा प्रयत्न असल्याचंही पोलिसांनी म्हटलं आहे. दरम्यान, ऐन नव्या वर्षात पोलिसांनी केलेली ही मोठी कारवाई मानली जात आहे.

शिळडायघर पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यातील पाहिजे असलेला आरोपी मुकेश (पूर्ण नाव माहित नाही) हा साथिदारांसह अमरावती बस स्टँड परिसरात असणाऱ्या येथील हॉटेल शितल लॉजिंग अँण्ड पंचम रेस्टॉरंट या ठिकाणी येणार असल्याची माहिती ठाणे गुन्हे शाखा घटक १ चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे यांना मिळाली. घटक १ च्या पथकाने अमरावती येथे जाऊन हॉटेल शितल लॉजिंग अॅण्ड पंचम रेस्टॉरंट या ठिकाणी सापळा रचून आरोपींना ताब्यात घेतले.

आरोपींची अंगझडती घेतली असता त्यांच्याजवळ असलेल्या काळ्या रंगाच्या हँण्ड बॅगेत फॅक्टरी मेड बनावटीचे लोखंडी व स्टिलच्या धातुचे १० पिस्टल सापडले. तर रहिम शेख याच्या पँटच्या खिशात KF 7.65 असे कोरलेले ४० जिवंत काडतुसे, मोबाईल सापडले. आरोपींना न्यायालयात हजर केले असता त्यांना ७ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

ही कारवाई पोलीस आयुक्त विवेक फणसळकर, पोलीस सह आयुक्त मधुकर पांडेय, अप्पर पोलीस आयुक्त गुन्हे प्रविण पवार, पोलीस उपायुक्त गुन्हे दिपक देवराज, सहायक पोलीस आयुक्त शोध १ बाजीराव भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणे गुन्हे शाखा घटक १ चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे, सहायक पोलीस निरीक्षक अविराज कुराडे, समिर अहिरराव, पोलीस हवालदार अबुतालीब शेख, सुनिल जाधव, शिवाजी गायकवाड, सुनिल माने, पोलीस नाईक रविंद्र काटकर, विक्रांत कांबळे, रिझवान सय्यद, दादा पाटील, पोलीस कॉन्स्टेबल भगवान हिवरे यांच्या पथकाने केली.