मारहाण प्रकरणी पोलिसांवर FIR करणार, जामिया विद्यापीठाच्या कुलगुरूंनी सांगितलं

नवी दिल्ली : वृत्त संस्था – जामिया मिलिया इस्लामिया विद्यापीठाच्या कुलगुरू नजमा अख्तर यांनी काल नागरिकत्व संशोधन कायद्याविरूद्धच्या आंदोलनानंतर घडलेल्या हिंसक घटनाबाबत माध्यमांना सविस्तर माहिती दिली. नागरिकता सुधारणा कायद्याविरोधात काल राजधानी दिल्लीत उग्र आंदोलन झाले. या आंदोलनादरम्यान रविवारी जामिया नगर आणि जामिया विद्यापीठ या दोन्ही ठिकाणी हिंसक घटना घडल्या आहेत.

कुलगुरू नजमा अख्तर यांनी म्हटले की, पोलीस परवानगी न घेता विद्यापीठ परिसरात घुसले होते. जबरदस्तीने विद्यापीठ परिसरात घुसण्याच्या त्यांच्या कृतीविरोधात आम्ही पोलिसांविरूद्ध खटला दाखल करणार आहोत. पोलिसांनी विद्यार्थ्यांना घाबरविण्यासाठी मारहाण केली. लायब्ररीत घुसून विद्यार्थ्यांवर लाठीमार केला. जामियामध्ये झालेल्या या हिंसेची उच्चस्तरीय चौकशी झाली पाहिजे, कारण यामध्ये काही बाहेरच्या लोकांचाही समावेश होतो.

विद्यार्थ्यांनी अफवांवर विश्वास ठेवू नये
नजमा अख्तर म्हणाल्या, पोलिसांच्या या कारवाईमुळे जामिया मिलिया इस्लामिया विद्यापीठाचा विश्वास डळमळीत झाला आहे. पोलिसांच्या कारवाईत दोन विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याचे वृत्त चूकीचे आहे. मात्र, पोलिसांच्या मारहाणी सुमारे २०० नागरिक जखमी झाले असून यात अनेक विद्यार्थ्यांचा समावेश आहे. पोलिसांच्या हल्ल्यात विद्यापीठाचे मोठे नुकसान झाले आहे. विद्यार्थ्यांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहनही त्यांनी केले.

विद्यापीठाला टार्गेट करू नये
नजमा अख्तर म्हणाल्या, जामिया विद्यापीठाला टार्गेट करू नये. विद्यापीठाच्या अन्य अधिकार्थ्यांनी सांगितले की, रविवारी झालेल्या आंदोलनात बाहेरचे आणि विद्यापीठाच्या शेजारी राहणारे लोकही सहभागी झाले होते. परंतु, जेव्हा दिल्ली पोलिसांनी आंदोलनकर्त्यांना अडविण्याचा प्रयत्न केला तेव्हा हिंसक वळण लागले.

विद्यापीठ परिसरात गोळीबार नाही
पोलिसांनी विद्यापीठ परिसरात गोळीबार केला अथवा नाही, याबाबत विद्यापीठाचे रजिस्ट्रार एपी सिद्दीकी यांनी सांगितले की, आम्ही याबाबत पोलीस आयुक्त आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा केली, त्यांनी ही गोष्ट नाकारली आहे. पोलिसांनी परिसरातील मशीदीत प्रवेश केला आणि विद्यार्थीनींवर अश्लील पद्धतीने हल्ला केल्याचे वृत्तही चुकीचे असल्याचे विद्यापीठाने म्हटले आहे. सोशल मीडियावर अनेक अफवा पसरल्या असून आम्ही त्यासर्वांचे समर्थन आणि खंडन करू शकत नाही, असे विद्यापीठाकडून सांगण्यात आले.

फेसबुक पेज लाईक करा : https://www.facebook.com/policenama/