‘कोरोना’ संकटाचे भान ठेवून गणेशोत्सव साजरा करण्याचे पोलिसांकडून आवाहन

जेजुरी : पोलीसनामा ऑनलाइन (संदीप झगडे) –   दि 22 पासून राज्यात सार्वजनिक गणेशोत्सव सुरू होत असून कोरोना सारख्या संकटाचे भान ठेवून साधेपणात,श्रद्धा अबाधित ठेवून शासनाचे नियम पाळुन गणेशोत्सव साजरा करा.उत्सव काळात अनावश्यक खर्चाला फाटा देऊन गरजूंना मदत करा असे आवाहन भोर विभागाचे पोलीस उपअधीक्षक आण्णासाहेब जाधव यांनी केले .

जेजुरी पोलीस स्टेशनच्या वतीने पुणे जिल्ह्याचे ग्रामीण पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सार्वजनिक गणेशोत्सवाच्या निमीत्त नियोजन व आढावा बैठकीचे आयोजन केले होते . यावेळी जेजुरी शहरातील गणेशोत्सव मंडळाचे पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी बोलताना डीवायएसपी आण्णासाहेब जाधव म्हणाले की, मंडळांनी वर्गणीसाठी कोणावरही सक्ती करू नका,रस्त्यात मंडप टाकण्याची परवानगी नाही. मंदिर, हॉल, धर्मशाळा येथे सामाजिक अंतर ठेवून गणेशाची पूजा अर्चा करा,गर्दी न करता ओनलाईन पूजा आरती करण्याचा आग्रह ठेवा.मिरवणुकांना परवानगी नाही असे सांगितले.

जेजुरी पोलीस स्टेशनचे सहाययक पोलीस निरीक्षक अंकुश माने यांनी जेजुरी शहरासह सर्व परिसरात कोरोनाचा प्रादुर्भाव असून कोरोनाचा धोका कायम आहे.हा संसर्ग टाळण्यासाठी मंडळांनी खबरदारी घ्यावी, आरती व पूजेवेळी पाच पेक्षा अधिक कार्यकर्ते नसावेत, यावेळी सर्व नियम पाळावेत, सार्वजनिक गणेशाची मूर्ती ही चार फुटाच्या आत असायला हवी, तर घरी दोन फुटांच्या आत मूर्तीची स्थापना करावी, साउंड सिस्टीम,कार्यक्रम,मिरवणुका यांना बंदी आहे .

यावेळी नगराध्यक्षा वीणा सोनवणे, मुख्याधिकारी पूनम कदम यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले.यावेळी पोलीस उपनिरीक्षक विजय वाघमारे, नंदकुमार सोनवलकर, नगरसेवक जयदीप बारभाई, अजिंक्य देशमुख,माजी नगरसेवक हेमंत सोनवणे,भाजपचे शहर अध्यक्ष सचिन पेशवे आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक नितीन राऊत तर आभार नंदकुमार सोनवलकर यांनी मानले.