सांगली : विट्यातील युवकाचा खूनप्रकरणी इचलकरंजीत तिघांना अटक

सांगली : पोलीसनामा ऑनलाइन – सांगली जिल्ह्यातील विटा येथे सात दिवसांपूर्वी झालेल्या बालाजी कारंडे (वय 27, रा. भेंडवडे, ता. खानापूर) या मोबाईल शॉपी चालकाच्या खूनप्रकरणी तिघांना अटक करण्यात आली. इचलकरंजीतील शिवाजीनगर पोलिसांनी ही कारवाई केली. दुचाकी आडवी मारल्याच्या कारणातून धारदार चाकूने वार करून बालाजीचा निर्घृण खून केल्याचे तपासात स्पष्ट झाले आहे. याप्रकरणी ओंकार उर्फ मुरली दशरथ गेजगे (वय 21, रा. साईनगर, शहापूर) याच्यासह सागर रामचंद्र ऐवळे (वय 19), रोहन उर्फ चिक्या बापूराव रावतळे (वय 19, दोघे रा. घानवड, ता.खानापूर) यांना अटक करण्यात आले आहे.

खानापूर तालुक्यातील भेंडवडे येथे राहणार्‍या बालाजी कारंडे याची विटा येथे मोबाईल शॉपी आहे. 6 नोव्हेंबर रोजी त्याच्यावर वार करून निर्घृण खून करण्यात आला होता. या खुन खटल्याचे इचलकरंजी कनेक्शन असल्याची माहिती शिवाजीनगरचे उपनिरीक्षक एन.एच.फरास यांना मिळाली होती. त्यानुसार व मोबाईल लोकेशनच्या सहाय्याने संशयीतांपर्यंत पोहोचण्यात पोलिसांना यश आले.

विटा व घानवड परिसरातून ओंकार गेजगे, सागर ऐवळे व व रोहन रावतळे या तिघाही संशयीतांना ताब्यात घेण्यात आले. इचलकरंजीतील शहापूर परिसरात राहणारा ओंकार गेजगे याची आत्या घानवड येथे राहण्यास आहे. त्यातूनच त्याची सागर ऐवळे व रोहन रावतळे याच्याशी ओळख झाली. खुनाच्या घटनेदिवशी तिघेही संशयीत साळशिंगे रस्त्यावर असलेल्या शिवतारा धाब्यावर जेवणासाठी दुचाकीवरून निघाले होते. त्याचवेळी कारंडे हा दुचाकीवरून घरी परतत होता. कारंडे याने दुचाकी आडवी मारल्याचा राग तिघा संशयीतांना आला. तिघा संशयीतांनी कारंडे याचा पाठलाग करून त्याला साळशिंगी फाटा परिसरात गाठले.

त्याठिकाणी त्यांच्यामध्ये वादावादी झाली. यावेळी सागर व अन्य दोघांनी बालाजी याला मारहाण केली. ओंकार गेजगे याने चाकूने त्याच्या छातीत वार केला. यामध्ये बालाजी कारंडे जागीच कोसळला. दुचाकीवरून त्याला ढकलून दिल्याने प्रथमदर्शनी हा अपघात असल्याचा समज तेथील नागरिकांचा झाला. कारंडेला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र उपचार सुरू असताना त्याचा मृत्यू झाला. मात्र शवविच्छेदन अहवालानंतर त्याचा खून झाला असल्याचे समोर आले. विटा पोलिसही संशयीतांचा शोध घेत होते. त्या दरम्यान संशयीत शहापूर परिसरातील असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी तातडीने हालचाली करीत तिघाही संशयीतांना ताब्यात घेवून त्यांना विटा पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

Visit : Policenama.com