रेव्ह पार्टीवर पोलिसांचा छापा, ३१ मुलींसह २०० जण अटकेत

नोएडा : वृत्तसंस्था – नोएडा पोलिसांनी यमुना नदी किनारी असलेल्या एका फार्म हाऊसवर छापा टाकून या ठिकाणी सुरू असलेल्या रेव्ह पार्टीचा पर्दाफाश केला आहे. ही कारवाई आज (रविवारी) पहाटेच्या सुमारास करण्यात आली असून १६१ मुले आणि ३१ मुलींना अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी टाकलेल्या छाप्यामध्ये मोठ्या प्रमाणात बीअर, अंमली पदार्थ, हुक्का आणि काही संशयास्पद वस्तू जप्त केल्या आहेत.

गौतमबुद्ध नगरचे पोलीस अधीक्षक वैभव कृष्ण यांनी दिलेल्या माहितीनुसार, यमुना नदीजवळील सेक्टर क्रमांक १२९ मध्ये असलेल्या मायस्टीक व्हॅली रिसॉर्टवर तरुण-तरुणींची रेव्ह पार्टी सुरू असल्याची माहिती आज सकाळी मिळाली. त्यानुसार एक पथक तयार करून या ठिकाणी छापा टाकला. यावेळी फार्म हाऊसवर रेव्ह पार्टी करत असलेल्या १६१ मुलांना आणि ३१ मुलींना अटक करण्यात आली. अटक करण्यात आलेले सर्वजण राजाधानी दिल्ली येथील रहिवाशी आहेत. अटक करण्यात आलेल्यांमध्ये काही मुल शिक्षण घेतात, काहीजण व्यापाऱ्यांची मुले तर काहीजण नेत्यांची मुले आहेत.

या छेपेमारीनंतर या ठिकाणी रेव्ह पार्ट्या होत असल्याची आमची खात्री झाली आहे. यमुना नदी किनारी असलेल्या फार्म हाऊसवर येथून पुढे पोलिसांची पाळत राहणार आहे. तसेच आज ज्या ठिकाणी छापा टाकण्यात आला, त्या फार्म हाऊसची येथूनपुढे तपासणी केली जाणार असल्याचे पोलीस अधीक्षक वैभव कृष्ण यांनी सांगितले.