लॉकडाउन काळात काम मिळत नव्हते म्हणून महिलांच्या गळ्यातील दागिने चोरले, चतुःशृंगी पोलिसांकडून अटक

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – लॉकडाउन काळात काम मिळत नव्हते अन दोन दुचाकींचे हप्ते फेडणे तर गरजेचे होते. या विवंचनेतून एका तरुणाने थेट महिलांच्या गळ्यातील चैन चोरी करण्यास सुरुवात केल्याचे चतुःशृंगी पोलिसांनी समोर आणले आहे. त्याला तपास पथकाने अटक केली असून, त्याच्याकडून दोन गुन्हे उघडकीस आले आहेत. त्याच्याकडून ३ लाख ३० हजारांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे.

संजय नथू भगत (वय ३४, रा. उत्तमनगर, शिवणे) असे अटक केलेल्याचे नाव आहे. याप्रकरणी चतुःशृंगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे.

शहरात वाढत्या गुन्ह्यांना पायबंद घालण्यासाठी पोलिसांनी कंबर कसली आहे. त्यानुसार सराईत गुन्हेगारांची माहिती काढली जात असून, त्याबाबत गस्त देखील घातली जात आहे. यादरम्यान तपास पथक पाषाण परिसरातील साई चौकातून एका महिलेचे सोन्याचे गंठण हिसकावून नेणाऱ्या चोरट्याची माहिती काढत होते. सीसीटीव्हीच्या फुटेजनुसार तपासले जात असताना त्या दुचाकीचा क्रमांक मिळाला. या क्रमांकानुसार आरटीओ कार्यालयातून माहिती मिळविली. पोलिसांनी संजयचा पत्ता शोधून त्याला उत्तमनगरमधून ताब्यात घेतले. चौकशीत त्याने दुचाकींचे हप्ते भरण्यासाठी महिलांच्या गळ्यातील सोनसाखळींची चोरी केल्याची कबुली दिली.

ही कारवाई पोलीस उपायुक्त पंकज देशमुख, वरिष्ठ निरीक्षक अनिल शेवाळे, उपनिरीक्षक प्रेम वाघमारे, मोहन जाधव, प्रकाश आव्हाड, शैलेश सुर्वे, आशिष निमसे यांच्या पथकाने केली आहे.

You might also like