Pimpri : निगडीत भंगार व्यावसायिकावर गोळीबार करणारे आरोपी गजाआड

निगडी/पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – जुन्या भांडणाच्या रागातून निगडी येथे एका भंगार व्यावसायिकावर दोन गोळ्या झाडून जीवे मारण्याच प्रयत्न केल्याची घटना घडली. ही घटना रविवारी (दि.20) रात्री बाराच्या सुमारास निगडी येथील सेक्टर क्रमांक 22 मध्ये घडली होती. या गुन्ह्यातील आरोपींना अवघ्या सहा तासात अटक करण्यात आली आहे. आरोपींना तळवडे चिखली येथून अटक करण्यात आली.

सुरज पवार (वय- 28), राहुल यलप्पा सोनकांबळे (वय-28 रा. निगडी) असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी भारत ज्ञानोबा थोरात (वय-22 रा. आझाद चौक, निगडी) यांनी निगडी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. पोलिसांनी आरोपींचा शोध घेण्यासाठी पथके रवाना केली आहेत. या गुन्ह्यातील आरोपी प्रशांत रमेश कोळी (वय-32) हा फरार आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुन्ह्यातील आरोपी सुरज पवार याने फिर्यादी यांना ‘भाई’ बोलल्याच्या कारणावरुन फिर्यादी यांचा मोठा भाऊ संतोष थोरात आणि सुरज यांच्यात भांडण झाले होते. याच भांडणाचा राग मनात धरून आरोपींनी एका चारचाकी (एमएच 14 – 4034) वाहनातून आले. त्यावेळी फिर्यादी हे बिल्डींगच्या खाली मित्र रफिक याच्यासोबत गप्पा मारत उभे होते. अटक करण्यात आलेल्या आरोपींनी फिर्यादी आणि त्यांच्या मित्राला, तुम्हाला ठोकतो, गोळ्या घालतो असे म्हणत आरोपी कोळी आणि पवार यांनी त्याच्याकडे असलेल्या पिस्तुलातून त्या दोघांच्या दिशेने दोन गोळ्या फायर केल्या.

घटनेची माहिती मिळताच पोलिसांचा मोठा फौजफाटा घटनास्थळी दाखल झाला. आरोपींना पकडण्यासाठी गुन्हे शाखेचे 4 आणि निगडी पोलीस ठाण्याचे 3 असे एकूण 7 पोलिसांची पथके तयार करुन आरोपींचा शोध सुरु केला. दरम्यान निगडी पोलीस ठाण्यातील पोलीस हवालदार सतिश ढोले यांना आरोपी तळवडे चिखली येथे लपून बसल्याची माहिती मिळाली. मिळालेल्या माहितीच्या आधारे एक पथक तयार करण्यात आले. पोलिसांनी आरोपींना पकडण्यासाठी सपाळा रचला. पोलिसांना पाहून आरोपींनी पळून जाऊ लागले. पोलिसांनी आरोपींचा पाठलाग करुन पकडले. गुन्हा घडल्यानंतर पोलिसांनी अवघ्या सहा तासात दोन आरोपींना बेड्या ठोकल्या.

ही कारवाई पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश, अपर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, पोलीस उप आयुक्त गुन्हे सुधीर हिरेमेठ, परिमंडळ 1 चे पोलीस आयुक्त मंचक इंपर, सहायक पोलीस आयुक्त डॉ. सागर कवडे यांच्या मार्गदर्शनाखाली निगडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गणेश जवादवाड, सहायक पोलीस निरीक्षक एल.एन. सोनवणे, प्रशांत आरदवाड, व्ही. एम. धुमाळ, पोलीस उपनिरीक्षक महेंद्र आहेर, पोलीस हवालदार किशोर पढेर, सतिश ढोले, पोलीस नाईक शंकर बांगर, राजेंद्र जाधव, रमेस मावसकर, पोलीस शिपाई विनोद व्होनमाने, अमोल साळुंखे, भुपेंद्र चौधरी, विजय बोडके, राहुल मिसाळ, दिपक जाधवर, तुषार गेंगजे, पाचपांडे, आप्पा माने, गरदरे यांच्या पथकाने केली.