‘रेमडेसिवीर’चा काळाबाजार करताना डॉक्टर पोलिसांच्या जाळ्यात, 1200 चे इंजेक्शन 25 हजारांना विकत होता

नाशिक : पोलीसनामा ऑनलाइन – एकिकडे राज्यात कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याने प्रशासनाकडून कडक निर्बंध लागू केले जात आहेत. तर दुसरीकडे कोरोनावरील महत्त्वाचे असलेले रेमडेसिवीर इंजेक्शनचा राज्यात तुटवडा जाणवत आहे. मात्र, रेमडेसिविरचा काळाबाजार करताना चक्क एका डॉक्टरला पोलिसांनी अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्या डॉक्टरला बाराशे रुपयांचे इंजेक्शन तब्बल 25 हजार रुपायांना विकताना रंगेहाथ पकडण्यात आले. ही कारवाई रविवारी (दि.11) रात्री करण्यात आली. रात्री उशीरा पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

डॉ. रविंद्र श्रीधर मुळूक (वय-40) असे अटक करण्यात आलेल्या आरोपी डॉक्टरचे नाव आहे. या कारवाईमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. कोरोना रुग्णांसाठी उपयोगी ठरणारे रेमडेसिविर इंजेक्शन रुग्णांना मिळत नसताना डॉक्टरच याचा काळाबाजार करत असल्याने रुग्णांच्या नातेवाईकांकडून संताप व्यक्त होत आहे.

देवळाली कॅम्प व शहरातील रुग्णालयात दाखल रुग्णासाठी तीन रेमडेसिव्हिर इंजेक्शनसाठी सामाजिक कार्यकर्ते योगेश मोहिते हे शहरात फिरत होते. त्यावेळी त्यांना एक क्रमांक मिळाला. त्यांनी त्या क्रमांकावर संपर्क साधला असता समोरील व्यक्तीने फोन कट केला. त्यानंतर काही वेळाने त्या क्रमांकावरुन मोहिते यांना फोन आला. त्यात बाराशे रुपये किमतीचे रेमडेसिव्हिर प्रति इंजेक्शन 25 हजार रुपयांना देण्याचे ठरले. हे इंजेक्शन अमृतधाम परिसरात रात्री आठ ते साडेआठच्या सुमारास देण्यासाठी संबंधित व्यक्ती आली. मात्र मोहितेंनी यांच्याकडे अवघे 16 हजार रुपये असल्याचे सांगितले. त्यांनी संबंधितांना अमृतधाम परिसरातील अॅक्सिस बँकेच्या एटीएमवर बोलवले. यावेळी सद्गुरु हॉस्पिटलचे डॉ. रविंद्र मुळूक त्या ठिकाणी आले. डॉ. मुळूक येण्यापूर्वी या घटनेची माहिती मोहिते यांनी पोलिसांना दिली होती.

दरम्यान, एटीएमवर डॉ. मुळूक आले असता मोहिते यांच्यासोबत असलेल्या त्यांच्या मित्राने ते आलेल्या वाहनाचे मोबाईलमध्ये फोटो काढले. ही बाब मुळूक यांच्या लक्षात येताच त्यांनी पैसे तिथेच टाकून वाहनात बसून पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याचवेळी पोलीस त्या ठिकाणी आले. पोलिसांनी पाठलाग करुन डॉ. मुळूक यांना अडवून वाहनाची तपासणी केली. त्यावेळी वाहनामध्ये इजेक्शन मिळून आले. डॉ. मुळूक यांच्यावर पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. डॉ मुळूक हे सद्गुरु हॉस्पिटलचे संचालक असून घटना घडली त्यावेळी ते दवाखान्यात नसल्याची माहिती त्यांचे सहकारी संचालक डॉ. भाबड यांनी दिली.