Sangli News : सावकारानं वसुलीचा तगादा लावल्यामुळं पोलिस कुटुंबाची आत्महत्या, व्याजानं पैसे देणार्‍याच्या कर्नाटकातून मुसक्या आवळल्या

सांगली : पोलीसनामा ऑनलाइन

मिरज तालुक्यातील बेळंकी येथील निवृत्त पोलिस कर्मचारी आण्णासाहेब गुरुसिद्ध गव्हाणे यांच्यासह कुटुंबातील पत्नी व मुलाने आत्महत्या केली. पोलीस कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबाला आत्महत्येस प्रवृत्त केल्या प्रकरणी मिरज ग्रामीण पोलीस ठाण्यात सावकारी व आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलिसांनी सावकार संतोष महावीर मंगसुळे (वय-33 रा. हारुगिरी, कर्नाटक) याला अटक केली आहे.
शेअर मार्केटमदील गुंतवणुकीमध्ये तोटा झाल्याने तसेच सावकारांनी वसुलीसाठी तगादा लावल्याने निवृत्त पोलीस हवालदार आण्णासाहेब गव्हाणे (वय-65) पत्नी मालन गव्हाणे (वय-55) आणि मुलगा महेश गव्हाणे (वय-30) या तिघांनी शनिवारी (दि.23) गळफास घेऊन आत्महत्या केली होती.
आत्महत्या करीत असताना गव्हाणे कुटुंबाने शेअर मार्केटमध्ये झालेला तोटा आणि  सांगली, कोल्हापूर व बेळगाव जिल्ह्यातील 13 सावकारांनी 83 लाख रुपये वसुलीसाठी तगादा लावल्याने कंटाळून आत्महत्या करीत असल्याचे चिठ्ठित लिहिले होते. तसेच वेळोवेळी मारहाण व दमदाटी करुन मानसिक व शारीरिक त्रास दिला आहे. त्यामुळे आम्ही तिघे आत्महत्या करीत असल्याचे चिठ्ठीत म्हटले होते.

गव्हाणे यांनी लिहिलेल्या चिठ्ठीनुसार पोलिसांनी सावकारांवर गुन्हा दाखल केला. मिरज पोलिसांनी कर्नाटकातील हारुगिरी येथून संतोष मंगसुळे याला अटक केली आहे. अन्य आरोपी फरार असून त्यांचा शोध घेऊन लवकरच अटक करण्यात येईल असे पोलिसांकडून सांगण्यात येत आहे.