सीसीटिव्हीमुळे पर्दाफाश : प्रेमसंबंधातून २७ वर्षीय तरुणीचा गळा चिरून खून

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – विरारमध्ये असलेल्या साईनाथ पेट्रोल पंपा जवळील वैष्णवी अपार्टमेंटमध्ये राहणाऱ्या तरुणीचा शनिवारी (२७ एप्रिल) गळा चिरून खून करण्यात आला होता. या खुनाचा उलगडा करण्यात पोलिसांना यश आले आहे. परिसरात लावलेल्या सीसीटिव्हीमुळे पोलिसांना या गुन्ह्याचा उलगडा करण्यात यश आले.

मयुरी महेश मोरे (वय २७ वर्षे) असे मृत तरुणीचे नाव आहे. तर पोलिसांनी अमोल गणपत औधारे (वय २८ वर्षे) याला अटक केली आहे. याप्रकरणी मयुरीचा पती महेश मोरे याने फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मयुरी हिचा खून झाला त्या दिवशी पोलिसांनी तात्काळ तिच्या घरी धाव घेतली. त्यानंतर सीसीटिव्ही तपासला. तेव्हा २७ एप्रिल रोजी रात्री ८ वाजता एक तरुण येऊन गेला. तोच परत २८ एप्रिल रोजी सकाळी ९ वाजून २२ मिनिटांनी आला होता. महेशला पोलिसांनी त्याच्याबद्दल विचारले तेव्हा तो मयूरीच्या कामावरील मित्र आहे. त्याची नेहमी घरी ये-जा असते असे सांगितले. त्यावेळी पोलिसांनी अमोलला बोरिवली येथून ताब्यात घेतले. त्याच्याकडे चौकशी केल्यावर त्याने कबूली दिली. त्याचे आणि तिचे प्रेमसंबंध होते. त्यावेळी तो घरी गेला तेव्हा तू मला भेटायचे नाही, माझ्या घरी येऊ नको असे मयूरीने त्याला सांगितले. त्यानंतर रागाच्या भरात त्याने तिच्यावर चाकूने वार करून खून केला.